सतत घाईत असलेल्या मुंबई शहराच्या पोटात प्राणी-पक्ष्यांच्या शौकिनांचे छंद सुरळीतपणे सुरू आहेत. रेल्वे-मेट्रो-मोनो किंवा बेस्ट बसेसच्या प्रवासात आकाशात पाहायची जराशी उसंत मिळाली तर विशिष्ट पट्टय़ांमध्ये गिरक्या घेत गोल फिरणारा वीस-पंचवीस ते पन्नास पाळीव कबुतरांचा थवा हमखास दिवसातल्या कोणत्याही वेळेत दृष्टिपथात येऊ शकेल. हौशी ते आता व्यावसायिकपणाची सगळी समीकरणे जुळविणारी कबुतरबाजांची दुनिया मुंबईत अस्तित्वात आहे. टोलेजंग इमारतींच्या आणि सोसायटय़ांच्या नियमफेऱ्यापासून वाचवीत इथे उडान कबुतरांच्या स्पर्धा चालतात. सर्वाधिक काळ उडणाऱ्या कबुतराचे मालक विजेते ठरतात आणि दरवर्षी या स्पर्धाबाबत मुंबईतील कबुतरबाजांमध्ये उत्कंठा असते.

थोडा इतिहास

मुंबई आणि उपनगरे ही  कबुतरबाजीसाठी प्रसिद्ध नाहीत. मुळात माणसांना राहायला कमी जागा असताना कबुतरांची खुराडी, लॉट किंवा ढाबळी येथे तुरळकच होती. वसाहतवाद काळापासून ब्रिटिशांचा कबुतरबाजीचा शौक पुणे-कोल्हापूर आणि देशातील इतर वखारींच्या ठिकाणी फोफावला. ब्रिटिशांकडे या पक्ष्यांच्या देखरेखीसाठी खास कबुतरबाजांची नेमणूक असे. आज देशभरातील अनेक भागांनी कबुतरबाजीचा शौक जपला आहे.

मद्रास आणि हैदराबाद शहरांतील कबुतरे लोकप्रिय आहेत. मुंबई आणि उपनगरांतील चाळ-इमारत मालकांच्या एका पिढीने आपल्या मालकीच्या गच्च्यांवर छंद म्हणून कबुतरपालनाला सुरुवात  केली. १९९० पर्यंत  भायखळा, आग्रीपाडा, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, ठाणे या परिसरात उडान आणि पल्टर (उलटय़ा गिरक्या घेणारी) कबुतरांच्या दुर्मीळ प्रजाती असलेले कबूतर संग्राहक मोठय़ा प्रमाणावर होते.

झालेला बदल

नव्वदोत्तरीत मुंबई आणि उपनगरातील  अनेक चाळींच्या, छोटय़ा इमारतींच्या जागा मोठाल्या इमारतींनी घेतल्या. त्यात अनेक कबुतरबाजांच्या ढाबळी अस्तंगत झाल्या. काही ढाबळी आपल्या मालकांसोबत उपनगरांमध्ये स्थलांतरित झाल्या. सध्या सॅण्डहर्स्ट रोडपासून ते कर्जतपर्यंत, चुनाभट्टी-चेंबूरपासून पनवेलपर्यंत आणि वान्द्रे भागापासून ते वसई-विरापर्यंत स्पर्धात रमणारे कबुतरप्रेमी आढळतात. पाच-दहा पक्ष्यांपासून ते शेकडो पक्ष्यांच्या ढाबळी आहेत. विविधरंगी आणि ढंगांच्या आठशे कबुतरांचा संग्रह असलेले कबुतरपालकही आहेत.

बदलती मानसिकता

कबुतरबाजी व्यवसायाऐवजी छंद म्हणून केली जात होती. आज तो शौक काहीसा कमी झाला असला तरी शिल्लक असलेल्या कबुतरबाजांचे वेड अद्याप जुन्याच ताकदीने दिसते. पूर्वी काहीही कामधंदा न करणारी आणि आई-वडिलांच्या संपत्तीवर आयुष्य वेचणारी कबुतरबाज लोक समाजाकडून नाकारली गेलेली मानली जात. आजही भाई-दादा या नावाने ओळखणारे कबुतरबाज आहेत. पण कबुतरपालनाच्या आणि स्पर्धाच्या बदलत्या ट्रेण्ड्सना ओळखून ती या व्यवसायाला वाढवीत आहेत. मुंबईतील भायखळा परिसरातील अय्युब चोप्रा यांची कबुतरे चॅम्पियन म्हणून ओळखली जातात. सात-आठशे कबुतरांच्या त्यांच्या ढाबळीची आणि त्यातील चॅम्पियन कबुतरांची माहिती यूटय़ूबवर उपलब्ध आहे. त्यांची कबुतरे सलग १० तासांहून अधिक काळ उडणारी आहेत.

कबुतर स्पर्धाचे जग

पुणे-पैठण, पुणे-नागपूर अशा स्पर्धा राज्यात घोडय़ांसारख्याच डर्बीद्वारे खेळल्या जातात. सोडलेली कबुतरे आठ ते नऊ तासांत आपल्या घरी परततात. यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मुंबईतील कबुतरबाजी चालते. पहाटे सहा वाजता कबुतरबाज आपली कबुतरे उडवितात. सर्वाधिक काळ ज्याची कबुतरे आकाशात उडतात, ती चॅम्पियन ठरतात. दहा ते २० तास उडून रेकॉर्ड करणारी कबुतरे या स्पर्धामध्ये असतात. कुणी आपली चार कबुतरे सोडतो तर कुणी १०. त्या स्पर्धक कबुतरांनुसार विजेता ठरविला जातो आणि चॅम्पियन कबुतरमालकांना पारितोषिकाची रक्कम आणि ट्रॉफीज मिळतात.

स्पर्धाची तयारी

वर्षभर या कबुतरबाजांकडून आपापल्या ढाबळींची देखरेख केली जाते. विशिष्ट पद्धतीचे खाद्य त्यांना दिले जाते. तगडय़ा खुराकामुळे ती सुस्त होऊ नयेत म्हणून सकाळ आणि संध्याकाळी ठरलेल्या वेळेनुसार त्यांना उडविले जाते. मुंगीएवढय़ा आकाराचे दिसेस्तोवर ती उंच जातात. काही पल्टर कबुतरे आकाशात वेगात उंच जातात आणि उतरताना मात्र त्यांना त्रास होतो. हातात कबुतरे घेऊन ही मालक मंडळी उडान-पल्टरच्या पक्ष्यांना उतरण्यासाठी मदत करतात. दिवाळीनंतर फेब्रुवारी अखेपर्यंत या स्पर्धा चालतात. डर्बीसाठी तर मालक जिंकण्यासाठी अनेक क्लृप्त्या, व्यूहरचना करतात. कोणती कबुतरे स्पर्धेसाठी उतरवावीत हे ठरवण्यासाठी प्रतिस्पर्धी ढाबळीतील खबरा काढणे. लहान पिल्ले किंवा अंडी घातलेल्या मादीला स्पर्धेसाठी उतरवणे, जेणेकरून ती घरटय़ाच्या ओढीने लवकर परतेल असे प्रकारही चालतात.

rasika.mulye@expressindia.com