19 September 2020

News Flash

आम्ही मुंबईकर : पुरंदरे सदन

ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरात क्रांतिकारक सक्रिय झाले होते. तसेच महात्मा गांधीजींच्या विचाराने तरुण भारावून जात होते

(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद रावकर

ब्रिटिशांनी गरज नसलेले भूखंड भाडेपट्टय़ाने देण्यास सुरुवात केली होती. असाच एक भूखंड सुरेंद्र सिंहजी यांनी घेतला आणि त्यावर तीन मजली इमारत बांधली. परळ परिसरातील सेंट्रल रेल्वे वर्कशॉपच्या अगदी समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर ही इमारत आजही जुन्या आठवणींना उजाळा देत उभी आहे. सुरेंद्र सिंहजी यांनी १९२० मध्ये ही इमारत बांधली. इमारतीमध्ये ४२ निवासी गाळे, तर तळमजल्यावर १० दुकाने अशी या इमारतीची रचना. ही इमारत सुरेंद्र सदन या नावाने या परिसरात परिचित होती. सरकारी दरबारी चाकरी करणारे काही अधिकारी आणि कर्मचारी सुरुवातीच्या काळात या इमारतीत वास्तव्याला होते. या परिसरात हळूहळू गिरण्यांची धडधड सुरू झाली आणि हा परिसरा गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. कोकणातून अनेक तरुण मुंबईत डेरेदाखल होत होते. गिरण्यांमध्ये नोकरी करणाऱ्या यापैकी काही तरुणांना या चाळीने आश्रय दिला. चाळीत जागा मिळताच या गिरणी कामगारांनी सुरेंद्र सदनमध्ये आपले बिऱ्हाड थाटले.

ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरात क्रांतिकारक सक्रिय झाले होते. तसेच महात्मा गांधीजींच्या विचाराने तरुण भारावून जात होते. जहाल मंडळी क्रांतीच्या मार्गाने, तर मवाळ मंडळी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी झटत होते. अशाच एका तरुणामुळे सुरेंद्र सदन प्रकाशझोतात आली. देशात स्वातंत्र्यलढय़ाने वेग घेतला होता. या लढय़ात या चाळीतील लक्ष्मण जाधव या तरुणाने उडी घेतली. मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदानात ८, ९ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाला लक्ष्मण जाधव आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. स्वातंत्र्याची घोषणा करीत गांधीजींनी ‘करेंगे या मरेंगे’ अशी घोषणा दिली आणि मुंबईतील वातावरणच बदलून गेले. काँग्रेस नेत्यांची धरपकड सुरू झाली. मात्र आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते. पोलिसांचे अटकसत्र सुरूच होते. लक्ष्मण जाधव यांनी गिरणगाव गाठले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने गिरण्या बंद केल्या. स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. परदेशातील ट्राटस्कीवादी भारतामध्ये भूमिगत होऊन स्वातंत्र्यलढय़ाला मदत करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पुढे ट्राटस्कीवादाने त्यांच्या मनाचा पगडा घेतला आणि ते ट्राटस्कीवादी म्हणून ओळखले जाऊ लागले. सैतानचौकी नाक्यावरील इराण्याचे हॉटेल ट्राटस्कीवाद्यांचा अड्डा होता. त्यांच्यात लक्ष्मण जाधव सहभागी झाले. ‘चौकेवाले’ या नावाने ही मंडळी ओळखली जात होती. ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी या चौकेवाल्यांनी अनेक कारवाया केल्या. त्यात सुरेंद्र सदनमधील लक्ष्मण जाधव आघाडीवर होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वस्थ बसतील ते सुरेंद्र जाधव कसले? कामगार संघटना उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. केवळ संघटना उभ्या करून ते गप्प बसले नाहीत तर त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या. एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली १९६० मध्ये, तर जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली १९७४ मध्ये रेल्वेचा संप झाला. त्यातही लक्ष्मण जाधव सहभागी झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातही ते हिरिरीने उतरले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि पुन्हा एकदा हा लढवय्या चळवळीत उतरला होता. जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली एक गुप्त संघटना आकारास आली होती. या संघटनेने आणीबाणीच्या काळात डायनामाइटचा स्फोट घडवून आणला. बडोदा डायनामाइट वापरल्याबद्दल जॉर्ज फर्नाडिस, लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची धरपकड झाली आणि त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक आंदोलने, चळवळी केल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अनेक वेळा पोलिसांकडून त्यांना मारहाणही झाली. मुंबई महापालिकेची १९७८ मध्ये निवडणूक झाली. परळ भागातून लक्ष्मण जाधव यांनी निवडणूक लढविली आणि विजयी होऊन ते पालिकेत दाखल झाले. नगरसेवकपदावर असताना त्यांनी या भागातील अनेक लोकोपयोगी कामे पालिकेकडून करवून घेतली. लढवय्या लक्ष्मण जाधव यांच्यामुळे सुरेंद्र सदनही प्रकाशझोतात आली होती. अनेक नामवंत मंडळींचा राबता सुरेंद्र सदनमध्ये वाढला होता. सुरेंद्र सदनमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते वास्तव्यास होते. तर शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने या इमारतीमधील काही मंडली प्रभावित झाली. काही रहिवासी काँग्रेसच्या, तर काही शिवसेनेच्या विचारसरणीची मंडळी सुरेंद्र सदनात एकत्र नांदत होती. पण वेगवेगळ्या विचारसरणीची ही मंडळी गुण्यागोविंदाने राहत होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुरेंद्र सदनला एक वलय प्राप्त झाले होते.

साधारण १९८० च्या दशकात निवृत्त न्यायमूर्ती पुरंदरे यांनी सुरेंद्र सिंहजी यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आणि या इमारतीला पुरंदरे सदन अशी नवी ओळख मिळाली. आजघडीला ही इमारत पुरंदरे सदन म्हणून परिचित आहे. अलीकडेच अरविंद जैन यांनी ही इमारत विकत घेतली. शंभराव्या वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या या इमारतीमध्ये पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आहेत. मात्र आजही या इमारतीतील रहिवासी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आठवणींना उजाळा देताना लक्ष्मण जाधव यांचा आवर्जून उल्लेख करतात.

prasadraokar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:32 am

Web Title: article on purandare sadan
Next Stories
1 सिंचन घोटाळ्याशी संबंध नाही : अजित पवार  यांचे स्पष्टीकरण
2 दुर्गा सन्मान सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
3 मराठा आरक्षणासाठी २५ नोव्हेंबरपासून ‘ठिय्या’ आंदोलन
Just Now!
X