करोना व्हायरसमुळे तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सध्या दगडी चाळीतील आपल्या घरामध्ये कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आला आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

करोना व्हायरसमुळे अरुण गवळीला पॅरोल मिळाला आहे. लॉकडाउनमुळे गवळीच्या दुसऱ्या मुलीचे योगिताचे लग्न रद्द झाले. गवळीचा राजकीय वारसा पुढे चालवणारी त्याची मोठी मुलगी गीता गवळी कुटुंब आणि मतदारसंघ दोन्हीमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. गीता गवळी मुंबई महापालिकेत नगरसेविका आहे.

या संकटकाळात लोकप्रतिनिधी म्हणून ती तिची जबाबदारी सुद्धा पार पाडत आहे. “माझ्या मतदारसंघात ५० हजार लोक असून त्यांच्या सुरक्षिततेला माझे पहिले प्राधान्य आहे” असे गीता गवळी यांनी सांगितले. मतदारसंघातील गरीब, गरजू आणि स्थलांतरित मजुरांना त्यांच्याकडून रोज जेवणाची पाकिटे पाठवली जातात. कार्यालय बंद असल्यामुळे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.

दगडीचाळीच्याच परिसरातील लोखंडवाला टॉवर्समध्ये गीता गवळी राहतात. वर्षभराने तुरुंगातून घरी आलेल्या डॅडीला भेटण्यासाठी, त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी गीता गवळी इथे येत असतात. माझी सर्व भावंडे घरी असल्यामुळे लॉकडाउनचा काळ म्हणजे फॅमिली रियुनियन असल्याचे गीता गवळी यांनी सांगितले.

दगडी चाळ परिसरात शंभू नारायण मंदिर आहे. डॅडी दिवसातून पाच ते सहा वेळा तिथे आऱती करतो. देवपूजेमध्ये अरुण गवळीने स्वत:ला व्यस्त ठेवले आहे. मोकळया वेळेत इमारतीच्या गच्चीवर मुलांसोबत कॅरम खेळतो. आता तीन मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे डॅडीचा पॅरोलचा कालावधी वाढेल अशी गवळी कुटुंबाला अपेक्षा आहे.