News Flash

आषाढ सरी सरल्या

मुंबईतील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून येत्या २४ तासातही केवळ तुरळक सरी पडण्याचा अंदाज आहे.

| July 26, 2014 06:04 am

मुंबईतील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून येत्या २४ तासातही केवळ तुरळक सरी पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अंतर्गत भागातही पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता केवळ विरळ स्वरूपात उरला आहे. अरबी समुद्रात नैऋत्य तसेच पश्चिम दिशेला म्हणजेच मस्कत, ओमानच्या दिशेला मोसमी वारे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे देशाच्या दक्षिण भागातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईत पावसाच्या तुरळक सरी पडणार असून कोकण परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी येतील, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
आतापर्यंतचा राज्यातील पावसाचा अंदाज घेता मुंबई व विदर्भातील चार जिल्हे वगळता इतरत्र पावसाने सरासरी गाठलेली नाही. मराठवाडय़ाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आठवडय़ात मराठवाडा वगळता राज्याच्या इतर भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात सरासरी भरून निघण्यास मदत झाली असली तरी अजूनही राज्यातील ७० टक्के जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा २० ते ८० टक्के पाऊस कमी पडला आहे.
कोकण किनारपट्टीवरही ठाण्यात ३७ टक्के, रायगडमध्ये ३० टक्के, रत्नागिरीत २० टक्के तर सिंधुदूर्गमध्ये १२ टक्के पाऊस कमी पडला आहे. मुंबईत कुलाबा येथे सात टक्के तर सांताक्रूझ येथे दोन टक्के पाऊस अधिक आहे.
पाणीसाठय़ात वाढ
काही दिवसात पावसाचा जोर मंदावला असला तरी तलावातील पाणीसाठय़ात सातत्याने वाढ होत आहे. तीन महिन्यांना पुरेल एवढा जलसाठा तलावक्षेत्रांमध्ये जमा झाला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येच पावसाने वर्षांच्या पावसाची सरासरी गाठली होती. त्यामुळे २५ जुलै २०१३ पर्यंत सर्व तलावांमध्ये एकूण ११,०७,३९५ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले होते. यावर्षी मात्र महिनाभर दडी मारून उशिराने सुरुवात केलेल्या पावसामुळे आतापर्यंत ३,३३,४२७ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. वर्षभरासाठी सुमारे साडेतेरा लाख दशलक्ष लिटर पाणी आवश्यक असल्याने पाणीकपाती कायम आह़े
‘तुळशी’ लवकरच भरणार
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान असलेला, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलाव लवकरच भरण्याची शक्यता आहे. दरवर्षी सर्वात पहिल्यांदा भरणाऱ्या या तलावाची भरून वाहण्याची पातळी १३९.१७ मीटर आहे. २४ एप्रिल रोजी या तलावातील पाण्याची उंची १३८.१३ मीटरपर्यंत वाढली होती. तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ८०४५ दशलक्ष लिटर असून सध्या तलावात ६६७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जूनमध्येच मुसळधार पावसाची संततधार सुरू झाल्याने २५ जुलै २०१३ पर्यंत तुळशीसोबतच विहार, तानसा आणि मोडकसागर तलावही भरून वाहू लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 6:04 am

Web Title: ashadh rain over
Next Stories
1 गावितांवर गुन्हा का नोंदवला नाही?
2 महापालिकेच्या कार्यक्रमात सत्ताधारीच पाहुणे!
3 ‘पर्यावरणस्नेही गणेशोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवणारा परिसंवाद
Just Now!
X