विधानभवनाच्या आवारात मंगळवारी जी घटना घडली, ती दुर्दैवी होती. त्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेची आणि पोलिसांची माफी मागितली. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरू असून, घाईगडबडीत आपण कोणताही निर्णय घेणार नाही आणि दोषींना माफ करणार नाही, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.
विधान भवनातील प्रेक्षक गॅलरीमध्ये मंगळवारी दुपारी आमदारांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. आमदारांच्या मारहाणीमुळे सूर्यवंशी बेशुद्ध पडले आणि त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात न्यावे लागले. नालासोपाऱयातील बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावळ यांच्यावर सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सूर्यवंशी हातवारे करीत होते, त्यामुळेच त्यांना मारल्याचे आमदारांनी म्हटले आहे.
घडलेला संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये चित्रीत झाला असून, तो पाहून चौकशी केल्यावरच आपण निर्णय देऊ, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. या घटनेत सूर्यवंशी यांच्याकडून आमदारांचा अनादर झाला असेल, तर त्यांचीही आपण माफी मागत असल्याचे त्यांनी सांगितले.