शहरातील १२ रुग्णालयांच्या आवारात लवकरच सुरु

मुंबई : करोनाबाधित रुग्णांची गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने १२ रुग्णालयांच्या आवारामध्ये प्राणवायू निर्मितीचे १६ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांमध्ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करून तो रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पांमध्ये एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू निर्माण होईल. या प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्णांच्या फुप्फुसांना होणारा संसर्ग लक्षात घेता त्यांना सातत्याने अधिक क्षमतेने प्राणवायू पुरवावा लागतो. परिणामी, देशभरातील रुग्णालयांकडून प्राणवायूची मागणी वाढली आहे. प्राणवायू उत्पादक, वाहतूकदारांची क्षमता व मर्यादा लक्षात घेऊन प्राणवायू मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मुंबईतही तशीच परिस्थिती आहे.

रुग्णांना प्राणवायूची कमतरता पडू नये यासाठी पालिकेने आता आपल्या रुग्णालयांच्या आवारातच प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठादाराकडून जम्बो सिलेंडरद्वारे मिळणाऱ्या प्रतीलिटर प्राणवायूच्या तुलनेत पालिकेच्या प्रकल्पात निर्माण होणारा प्राणवायू निम्म्या दरात उपलब्ध होईल. हे प्रकल्प किमान १५ ते कमाल ३० वर्षे संचालित होऊ शकतात.

दोन वर्षांपूर्वी पालिकेने प्राणवायू निर्मितीचा कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर क्षमतेचा, तर जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये वर्षभरापूर्वी प्रतिदिन १ हजार ७४० घनमीटर (क्युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. या दोन्ही रुग्णालयांतील प्रकल्पात वातावरणातील हवेतून प्राणवायूची निर्मिती करण्यात येत आहे.

प्राणवायूची निकड लक्षात घेत १२ रुग्णालयांत १६ प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने लघू ई-निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशास मंजुरी मिळताच एका महिन्यात हे प्रकल्प उभारले जातील. या सर्व १६ प्राणवायू प्रकल्पातून मिळून प्रतिदिन अंदाजे ३३ हजार घनमीटर (सुमारे ४३ मेट्रिक टन) इतका प्राणवायू साठा निर्माण करणे शक्य होणार आहे. या १६ प्रकल्पांचा अंदाजे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

विविध रुग्णालये आणि करोना केंद्रांमध्ये प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प कायमस्वरूपी उभे राहतीलच. त्याचसोबत प्राणवायूचे सिलिंडर सांभाळण्याची व भरण्याची दगदग राहणार नाही. परिणामी यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मोठी मदत होईल, असा आशावाद अतिरिक्त पालिका आयुक्त पी.वेलरासू यांनी व्यक्त केला.