17 January 2021

News Flash

दहशतवादी संघटनेप्रमाणेच कट्टरपंथीयांचे संवाद तंत्र

लत्याच व्यक्तीच्या नावावरील सिमकार्डही दोन ते तीन व्यक्तींच्या माध्यमातून आरोपींकडे येत होते.

राज्याच्या एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारासह राज्याच्या अन्य भागातून स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला होता.

जयेश शिरसाट, मुंबई : अटकेत असलेल्या कट्टरपंथीयांच्या टोळीने पोलिसांच्या नजरेत न येता किंवा कुणकुण न लागू देता एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, महत्त्वाचे निरोप पोहोचते करण्यासाठी विशेष तंत्र विकसित केले होते. गेल्या दहा वर्षांपासून ही टोळी आणि टोळीच्या सदस्यांनी याच तंत्राचा वापर करून हत्यासत्र, घातपाती कारवायांचे कट आखले आणि ते अमलात आणले. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) महिनाभर सुरू असलेल्या तपासातून टोळीच्या संपर्क तंत्राशी निगडित महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

टोळीतील आरोपी एकमेकांशी बोलताना सांकेतिक नावांचा वापर करत. हत्येचा कट किंवा घातपाती कारवाईत एकदा दिलेली सांकेतिक नावे पुढल्या कारवाईची तयारी करताना बदलत. त्यामुळे प्रत्येक कारवाईसाठी वेगवेगळ्या नावांनी आरोपी एकमेकांच्या संपर्कात असत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप असलेला शरद कळसकरला विष्णू, सरवण, दादा अशी सांकेतिक नावे होती. वैभव राऊत याला वामन, सुधन्वा गोंधळेकर पांडेजी, अविनाश पवार याला अजितदादा तर डॉ. विरेंद्रसिंह तावडे भाईजान.

हत्येचा किंवा घातपाती कारवाईचा कट आखणारे आणि कटाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेलेच याविषयी एकमेकांशी बोलत. अलीकडच्या काळात या टोळीने निरोप देण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी चिठ्ठय़ा किंवा पत्रांचा वापर केला. ही पत्रे थेट न धाडता दोन ते तीन निरोप्यांकरवी नेमक्या व्यक्तीपर्यंत दिली जात होती. पत्रांमध्ये सांकेतिक भाषा, सांकेतिक शब्दांचा वापर प्रामुख्याने होत होता. शस्त्रसाठय़ाप्रकरणी एटीएसने आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. या प्रत्येकाकडून डायरी, पत्रे, चिठ्ठय़ा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या सर्वामध्ये सांकेतिक नावे, शब्द, भाषेचा वापर आढळून आल्याचे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

फोनवरून संपर्क साधण्याची वेळ आलीच तर या टोळीतल्या प्रत्येक साथीदाराकडे एकापेक्षा जास्त मोबाइल फोन असत. त्यातील एक सिमकार्ड आरोपीच्या नावावर, तर उर्वरित सिमकार्ड भलत्याच व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती पुढे आली. भलत्याच व्यक्तीच्या नावे असलेल्या सिमकार्डाचा वापर फक्त साथीदारांशी घातपात, हत्येच्या कटाबाबत बोलण्यासाठीच होत होता. त्यामुळे एटीएसने या सिमकार्डना ऑपरेशनल सिमकार्ड असे नाव दिले आहे. उदाहरणार्थ शरद कळसकरला अन्य आरोपी श्रीकांत पांगरकरशी फोनवर तातडीचे बोलायचे आहे. अशा परिस्थितीत कळसकर अन्य सिमवरून पांगरकरच्या नावावर असलेल्या सिमवर (मोबाइलवर) सांकेतिक लघुसंदेश पाठवणार. हा सांकेतिक लघुसंदेश मिळताच पांगरकर ऑपरेशनल सिमकार्ड अन्य मोबाइलमध्ये वापरून कळसकरला फोन करणार. या टोळीने संवादासाठी अनेक फोन वापरले आणि नष्ट केल्याची माहिती पुढे येत आहे. भलत्याच व्यक्तीच्या नावावरील सिमकार्डही दोन ते तीन व्यक्तींच्या माध्यमातून आरोपींकडे येत होते.

जालना, जळगाव येथून धरपकड

एटीएस पथकांनी दोन दिवसांपासून जालना, जळगाव येथे चौकशीसत्र सुरू करून दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. या दोन तरुणांचा संबंध अटक केलेल्या आरोपींसोबत आणि शस्त्रसाठय़ासोबत आहे, असे समजते.

लंकेश हत्येतील दोघे एटीएसच्या ताब्यात

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी बंगळुरू विशेष तपास पथकाने अटक केलेल्या भरत कुरणे आणि सुजीत कुमार या दोघांचा ताबा बुधवारी एटीएसने घेतला. शस्त्रसाठय़ाप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून दोघांची नावे पुढे आली होती. त्यानुसार एटीएसने बंगळुरू न्यायालयात दोघांचा ताबा मागितला. तेथील न्यायालयाने परवानगी देताच बुधवारी दोघांना अटक करत मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने दोघांना १५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत धाडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 3:01 am

Web Title: ats get important information about contact network of hindu extremists gang members
Next Stories
1 ‘स्वाभिमानी’ सात जागा लढवणार-शेट्टी
2 कास पठारावर सप्तरंगांची उधळण
3 विदर्भात यंदाही कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा
Just Now!
X