‘आवाज फाऊंडेशन’चा दावा; जुहू समुद्रकिनाऱ्यावर दोन महिन्यांपासून समस्या

जुहू समुद्रकिनाऱ्यावर दोन महिन्यांपूर्वी केलेल्या रोषणाईमुळे प्रकाश प्रदूषणाची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार ‘आवाज फाऊंडेशन’ने केली आहे. याबाबत फाऊं डेशनने पालिका आयुक्तांना पत्र लिहले असून शहरात उग्र रुप धारण केलेल्या प्रकाश प्रदूषणाच्या समस्येला लक्षात घेऊनच सुशोभिकरण आणि रोषणाईचे प्रकल्प हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात प्रकाश प्रदूषणासंबंधी चिराबाजार येथील रहिवाशांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारींमधून विविध विकास प्रकल्प, सार्वजनिक आणि मनोरंजनांच्या ठिकाणांवर बसविण्यात आलेल्या प्रखर दिव्यांमुळे होणाऱ्या ‘प्रकाश प्रदूषणा’चा प्रश्न अधोरेखित झाला आहे.

जुहू चौपाटीवर ऑक्टोबर महिन्यात सुशोभिकरण आणि सुरक्षेच्या कारणास्तव बसविण्यात आलेल्या एलइडी दिव्यांमुळे त्या भागात प्रकाश प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे निरीक्षण ‘आवाज फाऊंडेश’ने नोंदविले आहे. तांत्रिक उपकरणाचा आधारे प्रकाश प्रदूषणाची तीव्रता तपासून हा दावा फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात फाऊंडेशनकडून  प्रकाश प्रदूषणावर सविस्तर अभ्यास करुन, त्यासंबंधी अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. मरिन डाइव्ह समुद्रकिनाऱ्याच्या समोरील बाजूस असणारे जिमखाने तसेच मोठय़ा क्रीडांगणांमधील प्रखर दिव्यांमुळे प्रकाश प्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे, अशी तक्रार चिराबाजार येथील रहिवाशी नीलेश देसाई यांनी गेल्या महिन्यात केली होती. मात्र ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणाप्रमाणे प्रकाश प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही प्रकारची नियमांची चौकट पर्यावरण कायद्यामध्ये आखून देण्यात आलेली नाही. या निरीक्षणाअंती आसपासच्या रहिवाशांना प्रकाश प्रदूषणाच्या त्रासाला येत्या काळात सामोरे जावे लागणार असून यामुळे रात्रीच्या नैसर्गिक प्रकाशापासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आवाज फाऊ ंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले. तसेच समस्येबाबत पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सूर्यप्रकाशाच्या समतुल्य तीव्रता

जुहू चौपाटीवरील एलइडी दिव्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फाऊंडेशनकडून ‘लक्स मीटर’चा वापर करण्यात आला. याठिकाणी साधारण १०० फूट उंचीवर  एलइडी दिवे बसविण्यात आल्यामुळे दिव्यांखाली पसरणाऱ्या प्रकाशाची आणि किनाऱ्यावरील पाण्याच्या पातळीपर्यंत पोहचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता यावेळी मोजण्यात आली. त्यानुसार दिव्यांखालील प्रकाशाची तीव्रता ६७,००० लक्स म्हणजे जवळजवळ सुर्यप्रकाशाच्या समतुल्य होती. तर पाण्याच्या पातळीपर्यत पोहचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता ०.०३ लक्स ऐवढी मोजण्यात आली होती. हा प्रकाश रात्रीच्या वेळी चंद्राच्या पडणाऱ्या प्रकाशासारखा तीव्र असल्याचा दावा फाऊंडेशने केला आहे.