News Flash

पहिले विमान बनवणाऱ्या शिवाकर तळपदे यांची चित्रकथा उलगडणार

अमेरिकेतील राईट बंधूंनी १७ डिसेंबर १९०३ मध्ये जगातील पहिले विमान उडवले, असे इतिहास सांगतो. पण, त्याच्याही

| September 15, 2013 05:18 am

अमेरिकेतील राईट बंधूंनी १७ डिसेंबर १९०३ मध्ये जगातील पहिले विमान उडवले, असे इतिहास सांगतो. पण, त्याच्याही आठ वर्ष आधी मुंबई नगरीत पहिले विमान बनवून त्याचे उड्डाण करणाऱ्या शिवाकर बापूजी तळपदे या मराठी संशोधकाच्या पराक्रमाची कथा चित्रपटातून उलगडणार आहे. ‘मरूतसखा’ नावाच्या या पहिल्यावहिल्या विमानाने १८९५ साली मुंबईच्या चौपाटीवर उंच उड्डाण केले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे १५०० फु टापर्यंत उंच उडालेले हे विमान खाली कोसळले. त्यामुळे शिवाकर तळपदे यांच्या विमान संशोधनाची नोंद जागतिक स्तरावर झाली नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पण, आजवर इतिहासात दडपली गेलेली एका मराठी संशोधकाची कथा ‘बम्बई फेरीटेल’ नावाने येणाऱ्या चित्रपटातून उलगडणार असून ‘विकी डोनर’फेम आयुषमान खुराणा हा शिवाकर तळपदे यांची भूमिका साकारणार आहे.
भारतीय संशोधक आणि संस्कृत अभ्यासक सुब्बराया शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाकर तळपदे यांनी या विमानाची निर्मिती केल्याचा उल्लेख आढळून येतो. मुंबईस्थित शिवाकर बापूजी तळपदे हे स्वत: संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. तर सुब्बराया शास्त्री यांनी वैदिक शास्त्राचा अभ्यास करून ‘वैमानिक शास्त्र’ नावाचे पुस्तक लिहिले होते. त्याचाच अभ्यास करून शिवाकर यांनी ‘मरूतसखा’ची निर्मिती केली होती. परंतु, तेव्हा उपलब्ध असलेले तंत्रज्ञान पाहता असे विमान बनवणे शक्य नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, तळपदे यांच्या ‘मरूतसखा’च्या उड्डाणाचे वृत्त तत्कालिन ‘केसरी’ वृत्तपत्राच्या अंकात वाचायला मिळते. हे उड्डाण पाहण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये न्यायमूर्ती महादेव रानडे आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड उपस्थित होते, असाही उल्लेख आढळत असल्याने ‘मरूतसखा’ची दखल संशोधकांनाही घ्यावी लागली आहे.
शिवाकर तळपदे यांच्याविषयी जे उपलब्ध संदर्भ आहेत त्याच्यावरुनच ‘बम्बई फेरीटेल’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. गुनीत मोंगा यांच्या प्रॉडक्शन बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून एकेकाळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारे विभू पुरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे समजते. आयुषमान खुराणा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री पल्लवी शारदा यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. खरेतर, ‘बम्बई फेरीटेल’ या चित्रपटाच्याही आधी आयुषमानच्या शुजित सिरकार दिग्दर्शित ‘हमारा बजाज’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार होते. मात्र, त्याचे चित्रिकरण लांबल्यानेच ‘बम्बई फेरीटेल’च्या चित्रिकरणाला आयुषमानने सुरुवात केली असल्याचे समजते. आयुषमानसाठी ही भूमिका अत्यंत आव्हानात्मक आहे. कारण तो स्वत: पंजाबी असून त्याला महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा साकारायची आहे. त्यातही शिवाकर तळपदेंचे फारसे वर्णन किंवा साहित्य उपलब्ध नसल्यामुळे मर्यादित संदर्भाचा अभ्यास क रून व्यक्तिरेखा साकारण्याचे मोठे आव्हान आयुषमानसमोर आहे. या चित्रपटाविषयी अधिक माहितीसाठी निर्माती गुनीत मोंगा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 5:18 am

Web Title: ayushman khurane to be reveal story of first airplane builder shivkar talpade
Next Stories
1 होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २१ सप्टेंबरला
2 मालमत्ता कर भरण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंत मुदतवाढ
3 मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दय़ावर शिवसंग्राम आक्रमक
Just Now!
X