एसटी, बेस्ट, रिक्षा-टॅक्सींना फटका, बिघाडाचे प्रमाण वाढले

राज्यातील रस्त्यांवर जागोजागी असणाऱ्या खड्डय़ांमुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. एसटी तसेच बेस्टच्या बसगाडय़ांप्रमाणेच रिक्षा-टॅक्सी नादुरुस्तीचे प्रमाण एप्रिल-मेच्या तुलनेत जून आणि जुलै या दोन पावसाळी महिन्यांत वाढले आहे. मुंबईत जूनपासून आतापर्यंत बेस्टच्या तब्बल ५६७ बसचे टायर खराब होणे, चाकांमध्ये बिघाड होणे, असे प्रकार झाले आहेत. एसटी बसगाडय़ांचीही हीच परिस्थिती आहे.

एसटी बसच्या नादुरुस्तीचे ०.३० टक्के हे एरवीचे प्रमाण असते. ते जूनमध्ये ०.३३ वर पोहोचले असून, जुलैमध्ये त्यात आणखी वाढ झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे बस गाडय़ा विलंबाने धावणे किंवा प्रवासातच बिघडणे, अशा घटनाही सातत्याने घडत आहेत. रस्त्यांवर असलेले मोठे खड्डे, त्यामुळे साचणारे पाणी यातून वाट काढताना चालकांच्या नाकीनऊ येत आहेत. एसटी महामंडळाच्या सध्या १९ हजार बस गाडय़ा रस्त्यावर धावतात. त्यामुळे बिघाडाचे प्रमाण पाहता प्रवाशांची मोठी अडचणच होते.

गणेशोत्सवात एसटीसमोर विघ्न!

जवळपास राज्यातील चार हजार रस्त्यांवर खड्डे असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनीच दिली होती. त्यामुळे हे खड्डे तातडीने भरण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनानंतरही राज्यातील खड्डे कायम असल्याने गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात बस गाडय़ांची वाहतूक कशी साधेल, असा प्रश्न एसटी महामंडळाला पडला आहे.

एक किलो सीएनजी १४ किलोमीटपर्यंत पुरत होता. आता खड्डय़ांमुळे १० किलोमीटरसाठीच एक किलो सीएनजी खर्च होत आहे. खड्डय़ांमुळे वाहने बिघडून एक-दोन दिवसांचे उत्पन्न बुडण्याचे प्रमाण वाढले आहे.     – ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

खड्डय़ांमुळे रिक्षा बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच चालकांच्या आरोग्यविषयक समस्याही वाढत आहेत. खड्डय़ांमुळे जवळपास ४० टक्के रिक्षा नादुरूस्त असल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.       – शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन

खड्डय़ांमुळे दोन वर्षांत एक हजार मृत्युमुखी

राज्यातील रस्त्यांवर असलेले खड्डे हे वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गेल्या दोन वर्षांत खड्डयांमुळे तीन हजार ४३४ अपघातांमध्ये १,०५५ वाहन चालक आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे. या अपघातांनंतरही खड्डे कायमच आहेत. खड्डयांमुळे वाहन चालवताना चालकांना  समस्यांचा सामना करावा लागत आहे.  चारचाकी वाहनांनाही खड्डय़ांचा चक्रव्यूह भेदताना नाकीनऊ येत आहेत. वेगात असलेल्या चार चाकी वाहनाचा चालक समोर खड्डे दिसताच ब्रेक मारतो आणि त्यामुळे समोरील वाहनांवर जाऊन धडकतो, असेही प्रकार घडत आहेत. २०१६ मध्ये १,०६४ अपघातांत ३२९ जणांचा मृत्यू झाला. तर २०७७ मध्ये खड्डयांमुळे झालेल्या अपघातांत वाढ झाली असून २,३७० अपघातांत ७२६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.