गटबाजी रोखण्यासह राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागावाटपात थोरात यांची कसोटी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या बाळासाहेब थोरात यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजी थोपविणे, पक्षातील मरगळ दूर करणे आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडीतील जागावाटप ही आव्हाने पेलावी लागणार आहेत.

राज्यात गेले पाच वर्षे प्रत्येक निवडणुकांमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाली. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाला, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात सर्वात कमी जागा मिळाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कामगिरी फार काही चांगली झाली नाही. यातच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा फक्त एक उमेदवार निवडून आला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

पक्षाची पीछेहाट होऊनही पक्षांतर्गत गटबाजी कमी झालेली नाही. अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नव्हता. अन्य नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. या पाश्र्वभूमीवर सर्व नेत्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका थोरात यांना बजवावी लागणार आहे. उमेदवारी वाटप करताना निवडून येण्याची क्षमता या आधारे गटबाजी टाळून उमेदवारी द्यावी लागणार आहे. गुजरातमध्ये दबाव झुगारून थोरात यांनी छाननी समितीचे अध्यक्ष म्हणून उमेदवार निश्चित केले होते. यातूनच राहुल गांधी यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही उमेदवारी देताना फक्त निवडून येण्याची क्षमता या आधारे उमेदवारी वाटप करावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागावाटप हा कळीचा मुद्दा असेल. कारण राष्ट्रवादीने आधीच १४४ जागांची मागणी केली आहे. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेस पक्ष जास्त जागा लढला होता. पण आता काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याने राष्ट्रवादीची जास्त जागांची मागणी आहे. विदर्भ आणि मुंबईत राष्ट्रवादीची ताकद मर्यादित आहे. तरीही या दोन्ही विभागांमधील काँग्रेसच्या ताब्यातील काही जागांवर राष्ट्रवादीचा डोळा आहे. राष्ट्रवादीशी जागावाटपात थोरात यांना अधिक कठोर व्हावे लागेल.

नवे सारेच पदाधिकारी रिंगणात

पक्षाने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अध्यक्षपदी थोरात, तर कार्याध्यक्षपदी पाच जणांची नियुक्ती केली. पण कार्याध्यक्षपदी नियुक्ती केलेले यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजित कदम हे तिघे विद्यमान आमदार आहेत. नितीन राऊत आणि मुझ्झफर हुसेन हेसुद्धा विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. अध्यक्षांसह पाचही कार्याध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास निवडणुकीच्या काळात दैनंदिन व्यवस्थापन कोण बघणार, असा प्रश्न पक्षात उपस्थित करण्यात येत आहे. पक्षाने नियुक्ती करताना हा मुद्दा विचारात घेणे आवश्यक होते.

आव्हाने बरीच आहेत. पण या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाऊ. राज्यात काँग्रेसला नक्कीच चांगले यश मिळेल. जास्तीत जास्त तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असेल.     – बाळासाहेब थोरात, नवनियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.