गणेशात्सव काळात मुंबई ते गोवा महामार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव महामार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत टप्प्याटप्प्याने बंदी लागू होईल.

गणेशोत्सवापूर्वी आणि त्यादरम्यान कोकणात मुंबई ते गोवा महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात एसटी आणि खासगी गाडय़ा जातात. खड्डे आणि अवजड वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते. कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी प्रत्येक वर्षी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली जाते. यावर्षीही तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त असेल असे ट्रक, मल्टिएक्सेल, ट्रेलर यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून भाजीपाला, दूध, पेट्रोल, गॅस सिलेंडर यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई ते गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामाशी संबंधित असलेल्या  वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

या वाहतूकदारांना वाहतूक विभाग आणि महामार्ग पोलीस प्रवेशपत्र देणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

अवजड वाहनबंदीचा कालावधी

* ३० ऑगस्ट मध्यरात्री १२ ते २ सप्टेंबर रात्री ८ पर्यंत

* ७ सप्टेंबर सकाळी ८ ते ९ सप्टेंबर सकाळी ८ पर्यंत

* १२ सप्टेंबर सकाळी ८ ते १३ सप्टेंबर रात्री ८ पर्यंत

* ३ ते ६ सप्टेंबर आणि ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत बंदी. त्यानंतर रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत परवानगी

* ३० ऑगस्ट मध्यरात्री १२ ते १३ सप्टेंबर रात्री ८ पर्यंत वाळू, रेती, तत्सम गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांना बंदी

गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढते. ही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

-विजय पाटील, पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस-मुख्यालय)