18 January 2019

News Flash

बीअरच्या चढत्या किमतीने आणला फेस!

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत राज्यात बीअरची मागणी दुपटीने वाढते असा अनुभव आहे. पण यंदाच्या वर्षी चित्र वेगळे दिसू लागले आहे.

मद्यपान

महागडय़ा पेयाकडे मद्यप्रेमींची पाठ; उत्पादन शुल्कात वाढ झाल्याचा फटका

उन्हाची काहिली वाढू लागताच फेसाळती थंडगार बीअर मद्यप्रेमींना खुणावू लागते. वर्षभर ‘कडक’ पेयाच्या प्रेमात असणाऱ्यांचाही या काळात गारेगार बीअरकडे ओढा असतो. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत राज्यात बीअरची मागणी दुपटीने वाढते असा अनुभव आहे. पण यंदाच्या वर्षी चित्र वेगळे दिसू लागले आहे.

राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कदरात झालेल्या वाढीमुळे यंदाच्या वर्षी कमाल विक्री किमतीवर परिणाम होऊन बीअर चांगलीच महागली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींनी मोठय़ा संख्येने या फेसाळत्या पेयाकडे पाठ फिरवली असून मुंबई, ठाण्यासह राज्यभरात बीअरची विक्री लक्षणीयरीत्या घसरली आहे. एरवी बीअरविक्रीचे महत्त्वाची केंद्रे समजल्या जाणाऱ्या मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत एप्रिल महिन्यात जेमतेम ५३ लाख ७५ हजार लिटर इतकीच बीअरची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाणे निम्म्यावर (एक कोटी चार लाख लिटर) आले आहे. मागील काही वर्षांचे आकडे पहाता यंदा प्रथमच बीअरविक्री रोडावली आहे.  गेल्या वर्षी राज्य सरकारकडून आकारण्यात आलेल्या उत्पादन शुल्कातील वाढीचा परिणाम नफ्यावर होत असल्याने कमाल विक्री किंमत (एमआरपी) वाढवण्याची मागणी बीअर उत्पादक कंपन्याकडून करण्यात येत होती. बीअर उत्पादक कंपन्यांच्या मागणीवर ठोस निर्णय होत नसल्याने कंपन्यांकडून डिसेंबर २०१७ या महिन्यात काही काळ बीअरपुरवठा कमी करण्यात आला होता. याच काळात बीअर उत्पादक कंपन्यांकडून करण्यात येणारी मागणी राज्य सरकारने मान्य केली. बीअरच्या कमाल विक्री किमतीत वाढ केल्याने राज्यभरात बीअरच्या बाटलीची किंमत २० ते २५ रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीचा मोठा परिणाम या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील बीअरविक्रीवर दिसत आहे. यंदा माइल्ड बीअरच्या उत्पादन शुल्क दरामध्ये १७५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. तसेच स्ट्राँग बीअरच्या उत्पादन शुल्क दरामध्ये २३५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिली. तसेच ‘महाराष्ट्र पेय मद्य किरकोळ विक्री १९६६’ नुसार उत्पादन शुल्काच्या सूत्रात वाढ झाली आहे.

पूर्वी माइल्ड बीअरसाठी उत्पादन शुल्क दराचे सूत्र ३.५० होते. यात २५ टक्क्य़ांनी वाढ होऊन हे सूत्र ३.७५ एवढे झाले आहे. तसेच स्ट्राँग बीअरसाठी उत्पादन शुल्क दराचे सूत्र यापूर्वी ४.२५ होते. या वर्षी हे सूत्र ४.६० एवढे करण्यात आल्याने याचा परिणाम थेट बीअरच्या किमतीवर होत आहे. ही दरवाढ होण्यापूर्वी १३० रुपयांना बीअर विकली जात होती. दरवाढीनंतर हीच बीअर आता २४० रुपयांना विकली जात आहे. राज्यात सर्वाधिक मद्यविक्री ठाणे विभागात असलेल्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ात होत असते. या संपूर्ण दरवाढीचा परिणाम यंदाच्या बीअरविक्रीवर होत असून ठाणे विभागात ही विक्री कमालीची रोडावली आहे. राज्यात सर्वत्र सारखीच परिस्थिती असून नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्य़ांत गेल्या वर्षीच्या तुलनेत बीअरची विक्री कमी झाली झाली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात येत आहे.

यंदा उत्पादन शुल्क दरात झालेल्या वाढीचा परिणाम कमाल विक्री किमतीवर झाल्याने संपूर्ण राज्यभरात बीअरविक्री कमी झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात बीअरची मागणी कमी होऊन मद्यप्रेमींचा कल भारतीय बनावटीच्या मद्याकडे वाढला आहे.

– युवराज राठोड, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे विभाग.

First Published on May 15, 2018 3:47 am

Web Title: beer price hike