मुंबई : करोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सोमवार, १८ मेपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यासंदर्भात मागणी करून दोन दिवस उलटल्यानंतरही बेस्ट उपक्रमाकडून चर्चेसाठी प्रतिसाद न मिळाल्याने बेस्टचे कर्मचारी ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नाहीत.

याचा सर्वात मोठा फटका अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या ने-आणीच्या प्रक्रियेला बसणार आहे. याशिवाय ‘बेस्ट’ची वीजपुरवठा विभागाचे कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याने मुंबईत वीजसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे.

‘बेस्ट’ उपक्रमातील जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक बेस्ट कामगाराची करोना चाचणी दररोज करावी, बेस्ट कर्मचाऱ्यांवरील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करणे, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरसह अन्य सुरक्षा साधने पुरवावी, करोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना शहीद दर्जा द्यावा, अशा अनेक मागण्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केली होती. मात्र, त्यावर राज्य सरकार तसेच महापालिका किंवा बेस्ट प्रशासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने संघटनेने सोमवारपासून कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारपासून कर्मचारी संपूर्ण टाळेबंदी पाळून ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करणार असल्याचे समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

सेनाप्रणित संघटनेची वेगळी भूमिका

सध्याच्या परिस्थितीत बंद पुकारणे योग्य नसल्याचे सांगत शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने वेगळी भूमिका घेतली आहे. या बंदला कामगार सेनेचा पाठिंबा नसून कर्मचारी कामावर येतील, असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. ‘बेस्ट प्रशासन करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देत आहे. याशिवाय दहा लाखांपर्यंत विमाही आहे व अन्य उपाययोजनाही करत आहे. मग बंद करून काय साधणार,’ असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ‘काही मंडळी प्रशासनाबाबत अपप्रचार करून सेवेत खंड पाडत आहेत’ असे म्हटले आहे. तसेच १८ मेपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता आणि अन्य बससेवा नियमितपणे कार्यरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या एक हजार गाडय़ा

बेस्टची परिवहन सेवा ठप्प होणार असल्याने अत्यावश्यक सेवा सुरू राहावी यासाठी एसटी प्रशासनाने जवळपास एक हजार बसगाडय़ांची तयारी ठेवली आहे. सध्या बेस्टच्या दीड हजार बसगाडय़ा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावतात. तर चालक, वाहक, वाहतूक निरीक्षक यासह अन्य कर्मचारी मिळून ३,५०० कर्मचारी कार्यरत असतात. याशिवाय वीजपुरवठा विभागातील कर्मचारीही सेवेत आहेत.