मुंबईकरांसाठी मार्च २०२२ पर्यंत बेस्ट बसगाडय़ांचा ताफा वाढवण्यात येणार आहे. २,५०० पेक्षा अधिक बसगाडय़ा मुंबईकरांच्या सेवेत येतील, अशी माहिती बेस्टच्या अर्थसंकल्पातून देण्यात आली.

२०२१-२०२२चा १ लाख ४४ हजार रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आता अंतिम मंजुरीसाठी तो पालिकेकडे पाठविण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाचे एकूण उत्पन्न ६८२८.१४ कोटी असून, खर्च ६८२८.१२ कोटी इतका आहे. तर एकूण शिल्लक २ लाख ७ हजार असून, त्यापैकी विद्युतपुरवठा विभागाची शिल्लक ६३ हजार आहे. ही रक्कम विद्युतपुरवठा विभागाच्या भांडवली खर्चाकरिता वापरण्यात येईल. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची एकूण शिल्लक १ लाख ४४ हजार एवढी दर्शविण्यात आली आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षांमध्ये बसभाडय़ातील सवलतीपोटी स्वातंत्र्यसैनिकांकरिता ३ कोटी ३१ लाख, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ३६ कोटी ५३ लाख, ज्येष्ठ नागरिकांकरिता ६४ लाख आणि पत्रकारांकरिता ३१ लाख याप्रमाणे ४० कोटी ७९ लाख एवढा वित्तीय भार सोसावा लागल्याचेही अर्थसंकल्पात नमूद केले आहे.

२०२१-२२ या वर्षांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांमधून मिळणारे उत्पन्न  २७२ कोटी उत्पन्न आणि ७६२ कोटी रुपये खर्च ४९० कोटी रुपये घट दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा प्रवर्तित करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून उपक्रमाला तोटा सहन करावा लागणार नाही, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी समितीच्या झालेल्या बैठकीत दिले.

बेस्टचा ताफा वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे अर्थसंकल्पातून सांगण्यात आले. सध्याच्या घडीला बेस्टकडे ३,८७५ बसगाडय़ा असून त्यामध्ये १,०९९ बस भाडेतत्त्वावरील आहेत. याव्यतिरिक्त ३०० विद्युत बसगाडय़ांचा खरेदी आदेशही देण्यात आला आहे. तसेच ६०० एकमजली सीएनजी बसगाडय़ांकरिता निविदा प्रक्रिया कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात उपक्रमाचा एकूण बसताफा ३१ मार्च २०२२ पर्यंत ६ हजार ३३७ इतका करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.