बेस्टचा प्रस्ताव सर्वपक्षीय बेस्ट समिती सदस्यांकडून नामंजूर

चालकाकडूनच वाहकाचे काम करून घ्यावे, हा बेस्टचा प्रस्ताव सर्वपक्षीय बेस्ट समिती सदस्यांनी नामंजूर केला. भविष्यात कामगारभरती करताना बेस्ट उपक्रमाचा तोटय़ात चालणारा कारभार लक्षात घेऊन एकाच कामगाराकडून वाहक व चालकाचे काम करून घ्यावे, असा प्रस्ताव प्रशासनाने बेस्ट समितीसमोर आणला होता.

बेस्टची पॉइंट टू पॉइंट सेवा नसल्याने एकाच कामगाराला दोन्ही जबाबदऱ्या शक्य नाहीत. त्यामुळे हा प्रस्तावच चुकीचा आहे. बेस्टने ३०० ते ४०० बसेस भंगारात काढल्या आहेत. सुमारे साडेसात हजार वाहक आणि साडेसहा हजार चालक निवृत्त झाले आहेत. त्यांची पदे कधी भरणार हे आधी स्पष्ट करा. तसेच या प्रस्तावात कामगारांच्या भरतीचा उल्लेख नाही. बेस्टमध्ये अनेक वष्रे भरती करण्यात आलेली नाही. किती पदे रिक्त आहेत, ती कशी भरणार, त्यासाठी काय योजना आहे हे आधी प्रशासनाने स्पष्ट करावे, असा युक्तिवाद सर्वपक्षीय समिती सदस्यांनी केला.

भरती आता करण्याची योजना नाही. फक्त अर्हता-बदल करण्याचा विचार आहे. बेस्टच्या ३ हजार ३०० बसेस आहेत. तर १२ हजार २९० वाहक, ११ हजार ७४२ चालक आहेत. बसेसच्या संख्येप्रमाणे एका बसवर तीन पाळ्यांमध्ये तीन चालक आणि वाहक असायला हवेत. मात्र सध्या हे प्रमाण साडेतीन इतके आहे. नव्या आर्हतेनुसार भरती झाल्यास तो कर्मचारी एका वेळी वाहक किंवा चालकाचे एकच काम करेल.

सध्या कार्यरत असलेल्या चालक, वाहकांचे प्रमाण ७५ टक्के ठेवून उर्वरित २५ टक्क्यांमध्ये पडेल ते काम करणाऱ्या कामगारांची भरती केली जाईल, असा खुलासा प्रशासनाने केला. मात्र सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.