मात्र वायू इंधनाच्या टंचाईबाबत उपाययोजना नाहीच

मुंबई : सीएनजीवर चालणाऱ्या ५०० बसगाडय़ांचा प्रस्ताव मंगळवारी बेस्ट समितीने मंजूर केला. यामुळे बेस्टमधील सीएनजीवरील बसगाडय़ांची संख्या दोन हजारांवर जाणार आहे. मात्र शहरात आधीच सीएनजी गॅस पंपांचा तुटवडा असल्याने गॅस भरण्याकरिता तासन्तास वाट पाहावी लागते. त्यात सीएनजीवरील गाडय़ांची संख्या वाढणार असल्याने बेस्टच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसू नये म्हणून मुंबई महापालिकेपाठोपाठ बेस्टनेही गाडय़ा खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन दिवसांत डिझेल व सीएनजीवरील बसगाडय़ांचे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामुळे बेस्टमध्ये येत्या काळात भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांची संख्या वाढणार आहे. यामध्ये सीएनजी, डिझेल व विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांचा समावेश आहे. यापैकी सीएनजी बसगाडय़ांबाबत चिंता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी सीएनजी पंप आहेत, तेथे रिक्षा-टॅक्सीसह खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. सध्या बेस्टकडे १ हजार ८४५ बसगाडय़ा असून १५ बेस्ट आगारांत सीएनजी भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र ती अपुरी असल्याने बेस्टसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत शंका उपस्थित केली. त्यावर गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी बेस्ट बस आगारात आणखी सीएनजी पंप उभारण्याची मागणी महानगर गॅस लिमिटेडकडे करणार असल्याची माहिती बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बैठकीत दिली.

डिसेंबपर्यंत दाखल

भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांचा प्रस्ताव आचारसंहितेत अडकू नये यासाठी सोमवारी डिझेलवरील ५०० बसगाडय़ा खरेदीचा ९५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव बेस्ट समितीने मंजूर केला. त्यानंतर मंगळवारी सीएनजीवर धावणाऱ्या ५०० बसगाडय़ांचा १ हजार ६७ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाला पालिका सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे. हा प्रस्ताव बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येण्याची शक्यता आहे. या मंजुरीनंतर बेस्टच्या ताफ्यात एक हजार बसगाडय़ा डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे.

बसची संख्या वाढल्यास पंप अपुरे

मुंबईत एकूण १३१ सीएनजी पंप आहेत. या पंपांवर दोन लाख रिक्षा, २० हजारपेक्षा जास्त काळ्या-पिवळ्या टॅक्सी व अन्य खासगी वाहने गॅसकरिता अवलंबून आहेत. याव्यतिरिक्त बेस्टच्या १५ आगारांत स्वतंत्र गॅस पंप आहेत; परंतु बेस्ट गाडय़ा गरज भासल्यास बाहेरच्या पंपांवरही गॅस भरतात. सीएनजी गाडय़ांची संख्या वाढल्यास मात्र हे पंप बेस्टला अपुरे पडतील.