सुहास जोशी, मुंबई
भाऊ दाजी लाड संग्रहालयातील उद्वाहन (लिफ्ट) हे गेली १५ वर्षे विनापरवानाच सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. संग्रहालयातील उद्वाहनाचा अपघात झाल्यानंतर पाहणी करण्यास गेलेल्या विद्युत निरीक्षक (उद्वाहन) यांना या उद्वाहनाची कोणतीही नोंद चेंबूर येथील विद्युत निरीक्षकांच्या कार्यालयात नसल्याचे आढळून आले. संग्रहालयातील उद्वाहन वापरासाठी या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नसल्याचे विद्युत निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. माणसांची ने-आण करणाऱ्या सर्व प्रकारच्या उद्वाहनांसाठी या कार्यालयाचा परवाना बंधनकारक असल्याचे निरीक्षकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ एप्रिलमध्ये या उद्वाहनाचा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त डॉ. हवेवाला यांचा ९ मे रोजी रुग्णालयात मृत्यू झाला होता. संग्रहालयातील अपघातग्रस्त उद्वाहन २००४ मध्ये बसवण्यात आले होते. संग्रहालयातील या उद्वाहनाची सोय अपंगांसाठी करण्यात आली होती. काही वेळा विनंतीवरून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा दिली जात होती. संग्रहालयाच्या अंतर्गत भागात असणारे हे उद्वाहन पहिल्या मजल्यावरील ग्रंथालयात खुले होत असे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी स्वतंत्र उद्वाहन चालक नेमावा अशी सूचना करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समजते. उद्वाहनाच्या अपघातानंतर हा दोष कोणाचा यावरून एकमेकांवर दोषारोप सुरू आहेत.
संग्रहालयाच्या दाव्यानुसार संग्रहालयाचे सुरक्षा परीक्षण करण्यात आले होते. तसेच देखभाल दुरुस्ती सेवा पुरवठादारांनीही तीन महिन्यांपूर्वी या उद्वाहनाबद्दल कोणतीही तक्रार केली नसल्याचे संग्रहालयाकडून सांगण्यात येत आहे.

१५ वर्षे विनापरवाना वापर

उद्वाहन बसवून देणाऱ्या कंपनीने या उद्वाहनास विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगितल्यामुळे आजवर कोणताही परवाना घेतला नव्हता. अशा प्रकारचा परवाना आवश्यक असतो याची संग्रहालयास कल्पना नव्हती. उद्वाहनाच्या वार्षिक देखभाल दुरुस्ती सेवा पुरवठादारांनी वार्षिक कराराची पुनर्वाढ करण्यात टाळाटाळ केली आहे.
– तस्मीन मेहता, संग्रहालयाच्या मानद संचालक व व्यस्थापकीय विश्वस्त

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhau daji lad museum ingratiation illegal
First published on: 19-05-2019 at 12:11 IST