भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे एकबोटेंना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

१ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. तसेच येथे जमलेल्या लोकांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. दगडफेकीस प्रवृत्त करणे आणि लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी एकबोटे यांनी सुरुवातीला पुण्याच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेत तेथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. या अर्जात मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेजमध्येही मी दिसत नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले असून हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. सकाळी सुरुवातीला हे प्रकरण ज्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीसाठी आली त्या खंडपीठाने सुनावणीस नकार दिला. शेवटी दुपारी तीन वाजता दुसऱ्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर शुक्रवारी एकबोटेंच्या याचिकेवर सुनावणी होईल, असे खंडपीठाने सांगितले होते. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत खंडपीठानेही एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे कुठल्याही क्षणी आता मिलिंद एकबोटेंना अटक होण्याची शक्यता आहे.