मधु कांबळे

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

गेल्या वर्षी पुणे येथे आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली नाही, पोलिसांनी या दोन घटनेचा एकमेकांशी जोडलेला संबंध चुकीचा आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. केंद्रातील भाजप सरकारमध्ये सहभागी असलेल्या आठवले यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र  त्याच परिषदेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या काही विचारवंतांवर नक्षल समर्थक म्हणून करण्यात येत असलेल्या कारवाईचे त्यानी समर्थन केले. ज्या विचारवंतांवर कारवाई केली, ते आंबेडकरवादी नाहीत, असाही दावा त्यांनी केला.

गेल्या वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आणि शौर्यदिन साजरा करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायायांवर भीषण हल्ला करण्यात आला. त्यांच्या वाहनांची, तेथील घरांची, दुकानांची नासधूस, जाळपोळ करण्यात आली. पुणे पोलीस या संदर्भात तपास व कारवाई करीत आहेत. ३१ डिसेंबर २०१७ ला पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील कथित चिथावणीखोर भाषणांमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली असा पोलिसांनी शोध लावला असून, तशी न्यायालयात माहिती दिली जात आहे. रामदास आठवले यांनी मात्र पोलिसांचा हा शोध आणि कारवाईही चुकीची आहे, असे म्हटले आहे.

आठवले म्हणाले की, ३१ डिसेंबरला मी स्वत भीमा कोरेगाव व वडू गावाला भेट दिली. गोविंद गायकवाड यांच्या समाधीची काही समाजकंटकांनी नासधूस केल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात झाला. आंबेडकरी अनुयांवर हल्ले करण्यात आले. जाळपोळ करण्यात आली. त्यात काही विशिष्ट समाजाच्या संघटनांचा हात होता. एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली, या पोलिसांच्या मताशी आपण अजिबात सहमत नाही.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट करण्याचे पत्र वगैरे सापडल्यामुळे कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नक्षलवादाला आपला विरोध आहे आणि नक्षलवादी कुणी असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. नक्षलवाद्यांचा त्याग मोठा आहे, त्यांच्या मागण्यानांही आपला पाठिंबा आहे, परंतु त्यांचा हिंसेचा मार्ग चुकीचा आहे, त्याला आपला विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

..त्यामुळे कारवाई

एल्गार परिषदेचा आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराचा काही संबंध नाही असे आपण म्हणत आहात, तर मग याच परिषदेतील सहभागाबद्दल काही विचारवंतांना  नक्षलसमर्थक म्हणून अटक करण्यात आली, त्याबद्दल विचारले असता, त्यावर आंबेडकरवाद्यांवर कारवाई झालेली नाही, तर नक्षलसमर्थक म्हणून त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.