20 January 2019

News Flash

गिधाड, लावा, काळा थिरथिरा शहरातून हद्दपार?

‘मुंबई बर्डरेस’ च्या निरीक्षणातील भीती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईतील पक्षीसंपन्नता धोक्यात; ‘मुंबई बर्डरेस’ च्या निरीक्षणातील भीती

मुंबईत वाढते प्रदूषण आणि विकास कामांमुळे आक्रसलेल्या हरित क्षेत्राचा फटका येथील मुक्तसंचार करणाऱ्या पक्ष्यांवर झाला आहे. ‘मुंबई बर्डरेस’ या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत गिधाड, लावा (लावरी), काळा थिरथिरा हे पक्षी शहरातून हद्दपार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ‘मुंबई बर्डरेस’च्या माध्यमातून रविवारी करण्यात आलेल्या पक्षीनिरीक्षणाचा अहवाल जाहीर झाला असून यंदा पक्ष्यांच्या २३६ प्रजातींचे निरीक्षण झाल्याची नोंद त्यामध्ये करण्यात आली आहे. मात्र ही संख्या गतवर्षीच्या निरीक्षणातील आकडेवारीपेक्षा कमी असून गेल्या चार वर्षांत पक्ष्यांचा अधिवासात मोठे बदल झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.  एवढेच नाही तर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतही पक्ष्यांचा वावर वर्षांगणिक कमी झाला आहे.

मुंबई परिक्षेत्रात वावरणाऱ्या विविध पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. हिवाळा हा पक्षीनिरीक्षणाचा उत्तम काळ असल्याने गेली १३ वर्षे मुंबईत ‘बर्डरेस’चे आयोजन केले जात आहे. यासाठी हौशी पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासकांच्या मदतीने मुंबईमधील पाणथळ जागा, हरितक्षेत्रे, जंगलचा पट्टा आणि मुंबई शेजारी असणाऱ्या पक्षीअभयारण्यामधून पक्ष्यांचे निरीक्षण केले जाते. यंदा या उपक्रमात २८४ स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी ५० गटांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, उरण, वसई-विरार, कर्नाळा-फणसाड पक्षीअभयारण्य आणि शहरी भागात फिरून निरीक्षण केले. या माध्यमातून २३६ प्रजातींच्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले.

शहराच्या मध्यभागी असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतही पक्ष्यांचा वावर वर्षांगणिक कमी झाला आहे. २००५ साली याठिकाणी १०८ प्रजीतींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. ही संख्या २०१७ मध्ये ७९ होती. यंदा मात्र केवळ ४६ प्रजातींच्या पक्ष्यांचे निरीक्षण पक्षीनिरीक्षकांनी उद्यानातून केले आहे. याशिवाय शहरी भाग, सागरी आणि गोडपाण्याच्या पाणथळ क्षेत्रांमधील प्रजातींचे निरीक्षण ही गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे.

झालेला बदल..   

२००५ साली २७७ आणि २०१७ साली २३९ प्रजातींची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र त्याहूनही कमी प्रजातींची नोंद झाल्याने शहरीकरणाचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर पडलेला दिसतो आहे. २०१५ ते २०१८ या चार वर्षांमध्ये गिधाड, लावा (लावरी)- त्याचा जाती, काळा थिरथिरा या पक्ष्यांचे दर्शन झाले नसल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय पाणथळ आणि जमिनी गवताळ प्रदेशांमध्येही पक्ष्यांचा अधिवास गेल्या दहा वर्षांमध्ये कमी झाला आहे. तसेच तुतारी आणि सुतारपक्ष्यांची संख्या वर्षांनुवर्षे कमी होत असल्याची नोंद या अहवालामध्ये करण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये मुंबई

आणि आसपासच्या क्षेत्रांमधील पक्ष्यांचा एकूण अधिवासावर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे पाणथळ क्षेत्रांच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात विकास कामांना सुरूवात झाल्यामुळे येथे भेट देणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजीतींमध्ये घट झाली आहे.   – संजोय मोंगा, आयोजक आणि पर्यावरणतज्ज्ञ

First Published on February 10, 2018 12:51 am

Web Title: birds are exit from maharashtra due to pollution