राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. कार्यक्रम पत्रिकेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचंही नाव होतं. पण करोनाची लागण झाली असल्याने ते अनुपस्थित होते. दरम्यान घरात दोन करोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला अशी विचारणा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

“…त्याचा अर्थ कसंही वागा असा होत नाही”; महापौरांनी मुंबईकरांना खडसावलं

मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणांवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या वक्तव्यारुन मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न!

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा”.

आदित्य ठाकरे यांच्यासहित त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली आहे. विलगीकरणात असताना खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महापौरांनी काय म्हटलं आहे –
“जर अशा पद्धतीने लोक फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे असून त्या दिशेने पावलं चालली आहेत. लॉकडाउन राज्य सरकारलाही नको आहे, तुम्हा आम्हाला कोणालाच नको आहे. पण वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य यंत्रणेवरील बोजा कमी करायचा असेल तर नियम पाळायलाच हवे. आपण याआधीही रुग्णसंख्या शून्य करुन दाखवली आहे,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

“जगात दुसरी लाट तीव्रतेने आलेली दिसत आहे. लोकांनी घाबरु नये, पण स्वत:ला सांभाळा आणि नियम पाळा. दैनंदिन व्यवहार चाललेच पाहिजेत, पण त्याचा अर्थ कसंही वागा आणि रुग्णसंख्या वाढावी असं होत नाही. शेवटी कोणताही निर्णय हा मुंबईकरांच्या हिताचा, संरक्षणार्थ असणार आहे. उगाच घ्यायचा म्हणून निर्णय घेणार नाही,” असं आश्वासन त्यांनी दिलं.

“करोनावर राजकारण सुरु असून जनतेला उकसवलं जात आहे. याआधीच्या लॉकडाउनमध्ये जनतेने चांगली साथ दिली. गेल्या एक वर्षात अनेकांना मोठा धक्का बसला आहे. पण शेवटी वाचलो तरच लढू शकतो. पृथ्वीतलावर राहिलो तर आपण सगळं करु शकतो. त्यासाठी राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही निर्णय घेत आहेत. त्यावर राजकारण होता कामा नये. केंद्रातून काही मदतही मिळत नसून प्रतिकूल परिस्थिती आहे,” असंही महापौर म्हणाल्या आहेत.