उमाकांत देशपांडे, मुंबई

भाजप खासदार पूनम महाजन यांनी मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांमध्ये संघटना बांधणी मोहीम सुरू केली असून रस्ते वाहतूक क्षेत्रानंतर आता विमानतळ आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये संघटना बांधणीवर भाजपने ‘लक्ष्य’ केंद्रित केले आहे. या बहुतांश क्षेत्रांमध्ये शिवसेनेच्या कामगार संघटनेचे वर्चस्व आहे.

रस्ते वाहतूक क्षेत्रात रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूकदार यांच्या संघटना प्रामुख्याने शिवसेनेच्या ताब्यात आहेत. या संघटनांमध्ये समन्वयाचे काम हाजी अराफत शेख यांच्याकडे होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यावर भाजपने वाहतूक संघटनेची स्थापना करून या क्षेत्रांमध्ये संघटना बांधणीचे काम होती घेतले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी त्यात लक्ष घातले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये शशांक राव यांच्या संघटनेचे वर्चस्व आहे. शेलार यांनी बेस्ट संपाच्या वेळी राव यांना हाताशी धरून शिवसेनेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केल्याचा आरोपही शिवसेना आमदार अनिल परब यांनी संप मिटल्यावर केला होता.

विमानतळ कर्मचाऱ्यांमध्येही शिवसेनेचे प्राबल्य आहे. भाजप आमदार सुधाकर देशमुख यांनी काही काळापूर्वी भाजपची संघटना सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. आता विमानतळ कर्मचारी संघटनेची सूत्रे पूनम महाजन यांच्याकडे देण्यात आली असून त्यांनी नुकतेच विमानतळावर संघटनेचे मोठे कार्यालयही सुरू केले आहे. जीव्हीके कंपनी व्यवस्थापनाशी त्यांचे चांगले संबंध असून भाजपची संघटना भक्कम करण्यासाठी सदस्य नोंदणी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विमानतळ कर्मचारी संघटना ताब्यात घेऊन काम सुरू केल्याच्या वृत्तास महाजन यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमध्येही शिवसेनेच्या कामगार संघटना आहेत. तेथेही भाजपप्रणीत कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पावले टाकण्यात आली आहेत. दोन बडय़ा हॉटेलांमध्ये सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली असल्याचे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले. विविध क्षेत्रांमधील कामगार संघटनांमुळे शिवसेनेची ताकद आहे. तेथे शिरकाव करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.