महानगरपालिका निवडणुकीत लातूरमधील काँग्रेसचा गड भुईसपाट, परभणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला फटका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू झालेली भाजपची विजयाची घोडदौड तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये कायम राहिली असून, लातूर आणि चंद्रपूरमध्ये एकहाती सत्ता तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत शिवसेनेपेक्षा जास्त जागाजिंकत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. लातूर म्हणजे काँग्रेस हे समीकरण लोकसभेपासून पंचायतीपर्यंत लागोपाठ बसलेल्या पराभवांच्या धक्क्याने निकालात निघाले. चंद्रपूरमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळविले, तर परभणीमध्ये अनपेक्षितपणे काँग्रेसने सर्वाधिक जागाजिंकल्याने राष्ट्रवादीला त्याचा फटका बसला. महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मोठा धक्का बसला आहे.

चंद्रपूर आणि लातूरमध्ये भाजपला बहुमत मिळाले. परभणीमध्ये ६५ पैकी सर्वाधिक ३१ जागा जिंकल्याने काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपने चंद्रपूरची महानगरपालिका अपेक्षेप्रमाणेजिंकली, पण त्याबरोबरच लातूरमध्येही सत्ता संपादन केली. परभणीमध्ये शिवसेनेची ताकद असून, खासदार आणि आमदार हे दोन्ही शिवसेनेचे आहेत. तरीही शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त जिंकत परभणीमध्ये भाजपने शिवसेनेला मागे टाकले आहे. तीन महापालिकांमधील एकूण २११ जागांपैकी भाजपला सर्वाधिक ८० तर काँग्रेसला ७६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला २१ आणि शिवसेनेला फक्त आठ जागा मिळाल्या.

लातूर म्हणजे काँग्रेस हे वर्षांनुवर्षांचे समीकरण होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरवरील काँग्रेसचे वर्चस्व हळूहळू कमी होऊ लागले. लोकसभेपासून सुरू झालेली पराभवाची मालिका कायम राहिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने काँग्रेसवर मात केली होती. महानगरपालिका निवडणुकीत ७० पैकी ३६ जागाजिंकून भाजपने बहुमत मिळविले. काँग्रेसला ३३ तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. भाजपला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी गेल्या वेळी शून्य जागा असलेल्या भाजपचे हे यश लक्षणीय मानले जाते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील हे काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देण्यात यशस्वी ठरले.

परभणीत काँग्रेस

परभणीमध्ये सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढत होईल, अशी अपेक्षा होती. पण काँग्रेसने ६५ पैकी ३१ जागा जिंकल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. याशिवाय मराठी वस्त्यांमध्येही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. लातूर किंवा परभणीतील मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमला यश मिळालेले नाही. परभणीत राष्ट्रवादीला १८ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला बहुमतासाठी चार जागा कमी मिळाल्याने सत्तेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. परभणीत भाजपने शिवसेनेला मागे टाकले हा शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा आहे. मराठवाडय़ात वर्षांनुवर्षे शिवसेनेचे प्राबल्य आहे. पण जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त यश मिळविले. आताही भाजपला मिळालेल्या यशाने भविष्यात मराठवाडय़ात शिवसेनेची जागा आता भाजप घेण्याची शक्यता आहे.

चंद्रपुरात भाजपला यश

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या चंद्रपूरमध्ये ६६ पैकी ३६ जागा जिंकून भाजपने बहुतम प्राप्त केले. गेल्या वेळी सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसचे १२ उमेदवारच निवडून आले. उत्तर प्रदेशात पार सफाया झालेल्या बहुजन समाज पक्षाने दलितबहुल पट्टय़ात आठ जागाजिंूकन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि उमेदवारांची निवड चुकल्याने भाजपच्या जागा कमी झाल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादी आणि सेनेला धक्का

पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला परभणीची सत्ताही गमवावी लागली आहे. शिवसेनेला परभणीमध्ये चांगल्या यशाची अपेक्षा होती, पण तेथेही भाजपने मागे टाकले. लातूरमध्ये शिवसेनेला खातेही उघडता आले नाही.

untitled-7