करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. या दरम्यान ग्राहकांना पाठवण्यात आलेली वीजबिले भरण्यासाठी वीज कंपन्यांनी मुदत तसंत हप्त्यांमध्ये वीजेबिले भरण्याचं सांगत ग्राहकांना दिलासा होता. अशा परिस्थितीतही ग्राहकांनावीज जोडणी खंडित करण्यात येणार असल्याचे एसएमएस येत असल्याचा दावा भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. “राज्यात जशी सरकारची हेराफेरी सुरू आहे तशीच हेराफेरी मुंबईत सत्ताधाऱ्यांची सुरू आहे,” असा आरोप शेलार यांनी केला.

“लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिल भरण्यासाठी बेस्ट कडून मुदत / हप्ते देण्यात आले आहेत. पण तरीही वीज जोडणी खंडित करण्यात येईल असे एसएमएस येत आहेत. या विरोधात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना ४ तास घेराव घालण्यात आला. भाजपा नगरसेवक आक्रमक झाले,अखेर महाव्यवस्थापकांनी पळ काढला. न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करु,” असं आशिष शेलार म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “कुणाच्या सांगण्यावरुन मेसेज पाठवले जात आहेत? राज्यात सरकारची जशी हेराफेरी सुरु आहे, तशीच हेराफेरी मुंबईत सत्ताधाऱ्यांची सुरु आहे. मुंबईकरांची ही लूट आम्ही होऊ देणार नाही,”असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- “राज्य सरकार कोकणी माणसांशी का असं वागतेय?”; आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

आंदोलन सुरूच राहणार – मंगलप्रभात लोढा

गुरूवारी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, वाढीव वीजबिलांबाबत योग्य निर्णय होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याची प्रतिक्रिया लोढा यांनी बोलताना दिली. मुंबईकरांना पाठवलेली वाढीव वीजबिले रद्द करावीत आणि विज जोडणी खंडित करण्याच्या नोटीसा रद्द कराव्यात अशी मागणी लोढा यांनी यावेळी केली. तर आमदार राहुल नार्वेकर यांनी बेस्ट ग्राहकांना पाठविलेल्या नोटीसा महाव्यवस्थापकांना दाखवून त्यावर खुलासा मागितला. करोना लॉकडाउन काळात नागरिकांचे उत्पन्न अडचणीत आलेले असताना भरमसाठ वीजबिले ते कुठून भरणार असा संतप्त सवाल त्यांनी केला. अनेक नागरिकांवर यामुळे आत्महत्येची वेळ येईल असेही ते यावेळी म्हणाले.