भाजपा नेते किरिट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या या दोघांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. किरीट सोमय्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “मी आणि माझी पत्नी मेधा सोमय्या करोना बाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत” असं किरिट सोमय्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आजच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं. तसंच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही करोनाची बाधा झाली. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाही करोनाची बाधा झाली होती. आजच येडियुरप्पा यांना डिस्चार्ज मिळाला. अशात आता किरिट सोमय्यांना आणि त्यांच्या पत्नीला करोनाची बाधा झाली आहे.

भाजपा नेते किरिट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला करोना संसर्ग झाल्याचे समजतात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मला विश्वास आहे की दोघेही लवकर बरे होतील. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठिशी आहेत असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

आज महाराष्ट्रात ९ हजार १८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २९३ रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ६ हजार ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही ५ लाख २४ हजार ५१३ इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४७ हजार ७३५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत १८ हजार ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.