News Flash

“माझा असा वापर करणं राज ठाकरेंना शोभत नाही”, मनसे अध्यक्षांवर अतुल भातखळकरांचा निशाणा!

'लोकसत्ता'च्या 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अतुल भातखळकरांविषयी केलेल्या गौप्यस्फोटावर आता भातखळकरांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी राज ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर खोचक शब्दांमध्ये टीका करत आक्षेप घेतला आहे.

“२००९च्या निवडणुकांमध्ये अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागण्यासाठी आले होते”, असा खळबळजनक गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ‘लोकसत्ता’तर्फे घेण्यात आलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केल्यानंतर लागलीच त्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्या मुलाखतीत गौप्यस्फोट करण्यासाठी माझा असा चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, एवढंच मी सांगेन”, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात या मुद्द्यावरून भाजपा आणि मनसेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

…म्हणजे माझं राजकीय वजन वाढलंय!

दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या गौप्यस्फोटावर टीका करताना अतुल भातखळकर यांनी राज ठाकरेंना खोचक टोला देखील लगावला आहे. “राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी असे अनेक आरोप केले आहेत. पण मी त्यांच्याकडे कायम त्याकडे दुर्लक्ष केलं. २००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय”, असं ते म्हणाले. तसेच, “मी भारतीय जनता पार्टीत होतो, आहे आणि कायम राहीन. माझ्या दृष्टीने पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं आणि आज पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतोय”, असं देखील भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मनसेसोबतची अनेक माणसं सोडून जातात, यासंदर्भात राज ठाकरेंना या कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी अतुल भातखळकरांबाबत हा गौप्यस्फोट केला आहे. “जे सोडून गेले, त्यांची एक दिवसांची बातमी होते. जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल वाईटही वाटतं. माझ्यासाठी आले, पण स्थानिक गोष्टींसाठी सोडून गेले. पण सुरूवातीच्या काळात माणसं सोडून गेली नाहीत, असा एकतरी राजकीय पक्ष आहे का? शिवसेना असो, भाजपा असो कुणीही”, असं ते म्हणाले.

अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठं काम करूनही नशिबी काय आलं… पराभवच! -राज ठाकरे

“मी त्यांना सांगितलं, असा वेडपटपणा करू नका”

“मी तुम्हाला २००९ मधील विधानसभा निवडणुकीतील गोष्ट सांगतो. भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे विधानसभेचं तिकीट मागायला आले होते. भाजपाचेच एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे तिकीटासाठी आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितलं की, असं करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असं करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना अजून दोन माणसं तिथे होती. त्यांच्यासमोर सांगितलं. साक्षीदार म्हणून त्यांना उभं करू शकतो. हे असं घडतं असतं”, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.

करोना परिस्थितीसाठी सत्ताधारी जबाबदार!

दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी देशातील करोनाच्या गंभीर झालेल्या परिस्थितीला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. “जगावर संकट आलं आहे. त्याची कोणालाच कल्पना नव्हती. फक्त आपणच चुकीच्या अंगाने हे हाताळलं असं नाही. अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले. पण आपण अजूनही आलो नाही. मागच्यास ठेस पुढचा शहाणा तसं आपल्याकडे झालं नाही. इंडियन मेडिकल काऊन्सिलने दुसरी लाट येणार सांगितलं असताना आपला देश अलर्ट राहिला नाही. आपले राजकारणी, सत्ताधारी अलर्ट राहिले नाहीत. त्यामुळे २०२० पेक्षा २०२१ भयानक आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 8:56 pm

Web Title: bjp mla atul bhatkhalkar on mns chief raj thackeray claims wanted to join mns in 2009 pmw 88
Next Stories
1 Petrol Price : मुंबईकर न्यूयॉर्कपेक्षा दुप्पट किंमतीला खरेदी करतायत पेट्रोल!
2 मेट्रो-३ चे कफ परेड ते सीएसएमटी स्थानक पर्यंतचे भुयारीकरण १०० टक्के पूर्ण!
3 “…तरच पुढील वर्षी निवडणुका होतील!” महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले संकेत!
Just Now!
X