News Flash

भाजप आमदाराचा ‘भूसंपादना’चा डाव!

आघाडी सरकारने अनेक वर्षे आदिवासींची पिळवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षात असताना भाजपच्या आमदारांनी सातत्याने केला होता.

| January 2, 2015 01:42 am

आघाडी सरकारने अनेक वर्षे आदिवासींची पिळवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षात असताना भाजपच्या आमदारांनी सातत्याने केला होता. सत्तेत आल्यानंतर याच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ते राहत असलेल्या सोसायटीला अतिरिक्त चटई क्षेत्र मिळावे यासाठी विकासकाबरोबर संगनमत करून आपली जमीन हडपण्याचा उद्योग चालविला आहे, असा आरोप गोरेगावातील एका आदिवासीने केला आहे. गेली काही वर्षे भातखळकर आणि आरे कॉलनीमधील दूधसागर सोसायटीमधील काही रहिवाशांनी आपली छळवणूक चालविल्याचा आरोप करीत या आदिवासीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायासाठी साकडे घातले आहे.
अनिल जेठा दळवी हा आदिवासी, वारली जमातीचा असून आरे कॉलनी परिसरातील या जागेत दीडशे वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. दळवी कुटुंबीयांची काही जमीन सरकारने १९४९च्या सुमारास आरे दूधप्रकल्पासाठी ताब्यात घेतली. यातील ५,६९४.५ चौरस मीटर इतके क्षेत्र शासकीय अधिकाऱ्यांच्या दूधसागर गृहनिर्माण प्रकल्पासाठी १९७१ साली देण्यात आले. एकूण ८५७२.५ चौरस मीटरपैकी दूधसागर प्रकल्पाला दिलेली जागा वगळता २८७८ चौरस मीटर एवढी जागा दळवी कुटुंबीयांच्या मालकीची असल्याचे अनिल दळवी यांचे म्हणणे असून येथील सव्र्हे क्रमांक ९ एक हिस्सा क्रमांक २ मौजे दिंडोशी या जागेचा सात बारा, सहा बारा तसेच एम. दाखलाही दळवी कुटुंबीयांच्या नावावर आहे. त्याचप्रमाणे इंडेक्स दोनमध्येही त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. १९९४ साली महसूल विभागाकडे व्याजासह १९५७ पासूनचे पैसे भरल्याची पावतीही त्यांच्याकडे आहे. मात्र मालमत्ता पत्रकावर १९६६ साली तत्कालीन अधिकाऱ्याने सदर जागा शासनाची असल्याचे दाखवले आहे. याबाबत अपील करून मालमत्ता पत्रकावर आपले नाव दाखल करावे अशी मागणी आपण बऱ्याच काळापासून करत असून आपल्या जागेवर डोळा असलेले अतुल भातखळकर तसेच त्यांच्या सोसायटीतील काहीजण आपल्या विरोधात खोटय़ा तक्रारी दाखल करण्यापासून ते मालमत्ता पत्रकावर आपले नाव येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर सातत्याने दबाव आणत आहेत, असा आरोप दळवी यांनी केला आहे.
जागेसंदर्भातील सर्व कागदपत्रे माझ्या नावे असतानाही माझा छळ सुरू आहे. आता आमदार झाल्यामुळे त्यांचा दबाव वाढत असून या आर्थिक व मानसिक छळवणुकीला कंटाळून उद्या जर मी आत्महत्या केली तर त्याची जबाबदारी भातखळकर व आरे प्रशासनाची असेल असे अनिल दळवी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर फाइल तसेच माझी सर्व कागदपत्रे तपासल्यास जागच्या जागी मला न्याय मिळून मालमत्ता पत्रकावर माझे नाव चढविण्याचे ते आदेश देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनाही दळवी यांनी पुराव्यासह मदतीचे पत्र पाठवले आहे.
आरोप धुडकावताना सूचक मौन
अतुल भातखळकर यांनी मात्र हे आरोप साफ फेटाळले आहेत. ही जागा राज्य सरकारची आहे, तसे प्रतिज्ञापत्रही त्यांनी केले असून या जागेशी आपला कोणताही संबंध नाही, असे भातखळकर यांचे म्हणणे आहे. ही जागा काँग्रेसच्या काहींना हाताशी धरून बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून त्याला विरोध केल्याने दळवी आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि सातबाराचा उतारा, सहाबाराचा उतारा तसेच सदर आदिवासी बोगस आहेत का, असे विचारता त्याबाबत आपल्याला काहीही बोलायचे नसल्याचे भातखळकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:42 am

Web Title: bjp mla atul bhatkhalkars plot of land acquisition
Next Stories
1 ‘पीके’वरून भाजप सरकारमध्ये गोंधळ
2 नव्या वर्षांत घरे महाग
3 नववर्षांचे जल्लोषात स्वागत!
Just Now!
X