कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान अनुपस्थित राहिलेल्या भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने भाजपचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर ठपका ठेवला आहे. चव्हाण यांच्यावर कडक कारवाई करण्याची सूचना आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे.
स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान कोठावदे कौटुंबिक कारणास्तव बाहेरगावी गेल्या होत्या. या कालावधीत त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा व त्यात विरोधी गटाचा सहभाग असल्याचा कांगावा करत आमदार चव्हाण यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु कोठावदे यांनी आरोप फेटाळून लावत आमदार चव्हाण यांनी आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार महिला आयोगाकडे दाखल केली. आयोगाने नेमलेल्या मजलिस फाऊंडेशनच्या अ‍ॅड. फ्लेव्हिया अ‍ॅग्नीस, अ‍ॅड. निलंजना शहा, भाजपच्या युवा मोर्चाच्या शलाका साळवी यांच्या समितीने कोठावदे यांची स्वतंत्र चौकशी केली. चौकशीदरम्यान चव्हाण यांच्याकडून कोठावदे व त्यांच्या मुलाचा शारीरिक, मानसिक छळ झाल्याचे सिद्ध झाले. महिला आयोगाने या प्रकरणाचा आठ पानी अहवाल तयार केला असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पाठविला आहे.  

सभापतीपद निवडणुकीच्या आदल्या दिवशी कोठावदे घरात नव्हत्या. त्यांच्या दाराला पक्षाचा आदेश लावला. सभागृहात येताना कोठावदे मनसेसोबत होत्या. त्यामुळे त्यांच्या छळाचा प्रश्न येतोच कुठे? आयोगाने आपले म्हणणे ऐकून घेतलेले नाही, शिवाय कोणताही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले नाहीत. – आ. रवींद्र चव्हाण
चव्हाणांवरील आरोप
कोठावदे यांच्या मुलाला शिवीगाळ करणे तसेच कोठावदे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील संदेश पाठवणे.
यांच्यावरही ठपका
शिवसेनेचे कल्याणमधील नगरसेवक रवींद्र पाटील, नाशिकचे भाजप नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, अजय बोरसाट, पक्षाचे कार्यकर्ते रजत राजन, मयुरेश शिर्के, दिनेश दुबे, मयुरेश भाटे