भाजपा खासदार नारायण राणे यांनी आपण अद्यापही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्गाला करण्यात आलेल्या मदतीबाबत बोलताना ठाकरे सरकारने चेष्टा लावली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. विरोधी पक्षाला सामोरं जायची ताकद सत्तारुढ पक्षामध्ये नाही त्यामुळेच अधिवेशन पुढे ढकललं जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“निसर्ग चक्रीवादळ आलं तेव्हा मी कोकणातच होतो. किती नुकसान झालं आहे याची मला कल्पना आहे. नेते पाहणीसाठी जात असून त्याप्रमाणे मदत जाहीर केली जात आहे. जे नुकसान झालं आहे त्यासाठी दिलेली मदत अल्पशी आहे. त्याने घर किंवा दुरुस्ती काहीच होणार नाही. सरकारने मदत तसंच इतर बाबतीत फेरविचार करावा. सरकारची आर्थिक स्थिती कठीण आहे समजू शकतो. पण नैसर्गिक आपत्ती असल्याने तिजोरी कशीही असली तरी मदत केली पाहिजे,” असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

“सिंधुदुर्गाला २५ कोटींची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील २०० कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली असून कोणीही याबद्दल गांभीर्याने बोलत नाही. पैसे परत घेतात आणि जिल्हाधिकारी आपल्या मर्जीने पैसे देत आहेत. कोणीही विरोध करत नाही. त्यामुळे कोकणाकडे पाहताना मच्छीमारांच्या नुकसानीकडे पहावं. फक्त फेरफटका मारुन काही होत नाही. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका,” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

“मुंबईत आकडेवारी अजिबात कमी गेलेली नाही. महाराष्ट्रातील संख्याही वाढली आहे. रोज आकडेवारी वाढत आहे. सरकारने जरी प्रयत्न केले तर उघडं पडेल. मुंबईत आणि महाराष्ट्रात काही लपत नाही. उपचार जसा दर्जेदार हवा तसा मिळत नाही. त्याकडे दुर्लक्ष होत आहे,” असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

अधिवेशनात विरोधी पक्षाला सामोरं जायची ताकद सत्तारुढ पक्षामध्ये आहे असं मला वाटतंच नाही असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. सरकारला खर्च करायचा असेल, तर पुरवण्या मागण्या मान्य करुन घ्यायला पाहिजेत. त्यासाठी एक दिवसाचं अधिवेशन बोलावायला हवं अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.