शिवसेनेची नरमाई, आता भाजप आक्रमक

उमाकांत देशपांडे, मुंबई

राज्यात आम्हीच मोठा भाऊ, अशी अट घालत युतीसाठी तयार असल्याचे संकेत शिवसेनेने दिले असले तरी, ‘युतीची इच्छा असली तरी भाजप युतीसाठी लाचार नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावल्याने युतीबाबत तिढा कायम आहे. मुख्यमंत्रिपद, एकत्रित निवडणुका, राज्यात मोठा भाऊ या शिवसेनेच्या अटी भाजपला अमान्य असून शिवसेनेने तडजोड केली, तरच युती होणार आहे.

शिवसेनेने आतापर्यंत युतीच्या चर्चेस ठाम नकार दिल्याने ती सुरू होऊ शकली नव्हती. भाजप नेत्यांनी शिवसेनेशी चर्चा होत असल्याचे सांगूनही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा प्रस्तावच नसल्याचे सांगून स्वबळावर लढण्याचा निर्णय कायम असल्याचे अनेकदा स्पष्ट केले. शिवसेनेला राज्यात मोठा भाऊ समजून विधानसभेत पूर्वीप्रमाणे भाजपपेक्षाही अधिक जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.

बरेच काही गमावून भाजप युती करणार नाही, अशी भूमिका अध्यक्ष अमित शहा यांनीही काही दिवसांपूर्वी मांडली होती. शिवसेनेला मात्र पक्षवाढीचा विचार करता निम्म्याहून कमी जागा स्वीकारणे, चुकीचे वाटत आहे. जे मतदारसंघ भाजप लढवेल, तेथे शिवसेनेची वाढ खुंटणार आहे. त्यामुळेच, शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडली, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. ठाकरे यांनी खासदारांच्या सोमवारच्या बैठकीत हा मुद्दा मांडला, असे एका शिवसेना खासदाराने सांगितले. भाजप युतीची भाषा करीत असला तरी प्रत्यक्षात शिवसेनेला फोडण्याच्या तयारीत आहे. काही नेत्यांना पक्षात प्रवेशही दिले आहेत. शिवसेनेला भाजपबद्दल विश्वास वाटत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली असली तरी २०१४ नंतर आता भाजपची ताकद कमी झाली आहे, जनतेची अनेक मुद्दय़ांवर नाराजी आहे, याचा फायदा शिवसेनेने उठवावा आणि राज्यात शिवसेनेची ताकद असल्याचे या निवडणुकांमध्ये दाखवून द्यावे, अशी ठाकरे यांची भूमिका आहे. मात्र भाजपही आक्रमक असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेशी युती हवी असली तरी भाजप लाचार नाही, असे सांगून सेनेच्या जाचक अटी स्वीकारणार नसल्याचेच संकेत दिले आहेत.

* मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळावे, अशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी २०१४ मध्ये १५१ जागा लढविण्याच्या निर्णयावर शिवसेना ठाम राहिली व युती तुटली. भाजपकडे १२२ जागा असून शिवसेनेचे ६३ आमदार आहेत.भाजपच आता मोठा भाऊ असून त्या तुलनेत विधानसभेच्या जागा सोडल्या जातील, अशी भाजपची भूमिका आहे.

*मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायची भाजपची कदापिही तयारी नाही. भाजपने गेल्यावेळी लोकसभेत युती करून विधानसभेच्या वेळी तोडली होती.