मुंबई : साम, दाम, दंड, भेद, आमिषे, दहशत अशा अनैतिक मार्गाचा वापर करून, विरोधी पक्षांना संपविण्याचा आणि देशात व राज्यात एकपक्षीय हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक आजी, माजी आमदार, नेते पक्षांमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. ते म्हणाले की, घाऊक बाजाराप्रमाणे विरोधी पक्षांमधील लोकांची खरेदी-विक्री सुरूआहे. त्यासाठी काहींना चौकशा लावण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर काहींच्या चौकशा बंद करण्याची, त्यांच्या संस्थांना कर्ज थकहमी देण्याची आमिषे दाखविली जात आहेत. विरोधी पक्षांना संपविण्यासाठी भाजप दहशतीचा व अनैतिक मार्गाचा वापर करीत आहे. काँग्रेस नेते पी. चिदम्बरम आठ वेळा सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले होते, ते काही पळून जाणार होते का, परंतु त्यांना तुरुंगात टाकून भाजप सरकार सुडाचे राजकारण करीत आहे.

लोकशाहीत सत्तांतरे होतात, राजकीय परिवर्तन होते, परंतु सध्या भाजपकडून ज्या प्रकारे सत्तेचा गैरवापर केला जात आहे, तसा यापूर्वी कधीही झाला नव्हता. संसदीय लोकशाहीच नेस्तनाबूत करण्याचे हे षड्यंत्र आहे. लोकशाही वाचविली पाहिजे, हा आगामी विधानसभा  निवडणुकीतील काँग्रेसचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल, असे त्यांनी सांगितले.

जागावाटपात दोन्ही काँग्रेसला १२३ ते १२५ जागा

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. साधारणत: दोन्ही काँग्रेसमध्ये प्रत्येकी १२३ ते १२५ जागांचे वाटप होईल, ४१ जागा मित्रपक्षांसाठी ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीबरोबरही युतीसाठी चर्चा सुरू आहे, परंतु राष्ट्रवादीला वगळून आघाडी करण्याची त्यांची अट काँग्रेसला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट  केले.