२ कोटी २८ लाख रुपयांचा टेबल-खुर्ची खरेदीचा प्रस्ताव भाजपमुळे दफ्तरी

महापालिका कारभारावर देखरेख ठेवण्याकरिता सत्तेत सामील होण्याचे टाळणाऱ्या भाजपने आपल्या ‘पहाऱ्या’चा पहिला हिसका बुधवारी शिवसेनेला दाखवला. पालिका शाळांसाठी महागडय़ा साग लाकडाच्या खुच्र्या व टेबल कशासाठी, असा प्रश्न करत भाजपने विरोधकांच्या मदतीने २ कोटी २८ लाख रुपयांचा खरेदीचा प्रस्ताव थेट दफ्तरी दाखल करायला लावला. सत्तेत असूनही पराभवाला सामोरे जावे लागण्याची शिवसेनेची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, भाजप व सेनेतील या लढाईचा फटका पालिकेच्या शाळांना बसणार असून त्यांना नव्या खुच्र्या आणि टेबलांकरिता आणखी किमान तीन महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शाळांकडून शिक्षण विभागाकडे नोंदवण्यात आलेल्या मागणीनुसार सागाच्या २,४३८ खुच्र्या व १,११६ मेज (टेबल) घेण्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागवल्या होत्या. निविदांना आलेल्या प्रतिसादानंतर प्रशासनाने २ कोटी २८ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत बुधवारी मांडला. मात्र भाजप गटनेते मनोज कोटक यांनी या प्रस्तावाला विरोध केला. सागाचे लाकूड महाग असताना एवढय़ा खुच्र्या व टेबल घेण्याची गरज नाही. त्यापेक्षा स्टीलचे मजबूत फर्निचर घेण्यात यावे, असे त्यांनी सुचवले. कोटक यांच्या मागणीला विरोधी पक्षातून काँग्रेसचे गटनेते रवी राजा व समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी तातडीने मान्यता दिली. भाजपच्या इतर सदस्यांनीही ही मागणी उचलून धरल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक व सभागृहनेते यशवंत जाधव यांनी प्रस्तावाच्या बाजूने मत मांडले. सागाचे लाकूड टिकावू असते, शिवाय ते दुरुस्तही करता येते. सदस्यांच्या सूचना योग्य असल्या तरी आता प्रस्ताव रद्द केल्यास शैक्षणिक वर्षांत शाळांना वस्तू मिळणार नाहीत, असे जाधव यांनी सांगितले. त्यावर भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली. उपसूचना करू नये असे सांगूनही भाजपने माघार घेतली नाही. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना मतदान घेणे भाग पडले. भाजपचे नऊ व विरोधी पक्षातील पाच सदस्यांनी उपसूचनेच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेचे नऊ सदस्य असल्याने प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाला हा प्रस्ताव पुन्हा मांडण्यासाठी किमान तीन महिने वाट पाहावी लागेल किंवा नव्याने निविदा काढून दुसरा प्रस्ताव मांडावा लागेल.

सेनेची पहिलीच हार

सलग चौथ्यांदा पालिकेच्या सत्तेत आलेल्या शिवसेनेने आजपर्यंत भाजपच्या मदतीने मतदानाने अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले. मात्र सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजपने विरोधकाची भूमिका बजावून सेनेला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही केवळ सुरुवात असून यापुढे असे वारंवार घडेल, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.