सातारा व ठाणे जिल्हास्तरावरील भाजप व शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी-कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडून गेलेले अनेक कार्यकर्तेही पुन्हा पक्षात येत आहेत. राज्यभरातून अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून, काही नेतेही संपर्कात आहेत आणि त्यांचाही लवकरच पक्षात प्रवेश होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

मुंबईत गांधी भवन येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रात तरुण नेते रणजित देशमुख व ठाणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गरीब, सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता त्यावेळी काही जण पक्ष सोडून गेले. तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, रणजित देशमुख यांनी सातारा जिल्ह्य़ातील खटाव माण या दुष्काळी भागात सहकाराच्या माध्यमातून या भागाचे चित्र बदलण्याचे काम केले आहे.  विलासकाका पाटील उंडाळकर, उदयसिंह उंडाळकर हे नेते नुकतेच स्वगृही परतले आणि आता रणजित देशमुख यांच्या रूपाने पक्षाला आणखी ताकद मिळाली आहे.

या वेळी भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम चोरघे, भाजपचे ठाणे- पालघरचे माजी विभागीय संघटक तुकाराम चौधरी, शिवसेना माजी विभाग प्रमुख गणेश चौधरी, प्रभाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सदस्य सुरेश जोशी, भाजप ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू पाटील, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षक आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र भेरे, नवनाथ सुतार, देवीदास केणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.