छटपूजेच्या निमित्ताने बिहारींची राजकीय ताकद उभारण्याच्या उद्योगाला राज ठाकरे यांनी ‘मनसे स्टाईल’ने विरोध केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांना मुंबईत छटपूजा गुंडाळावी लागली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर याच उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ‘मुंबई भाजप’चे मराठी अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त मुंबईभर जाहिरातबाजी करून मनसेलाच वाकुल्या दाखवत आव्हान दिले आहे.
मुंबईत येणारी अन्यप्रांतीय मंडळी केवळ पोट भरण्यासाठी काम न करता आपापले मतदार संघ निर्माण करतात. बाहेरून येणारे त्यांचे नेते त्याला खतपाणी घालून भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणतात, अशी भूमिका घेत राज ठाकरे यांनी छटपूजेला जोरदार विरोध केला होता. शिवसेनेनेही अशाप्रकारे परप्रांतीयांच्या ताकद दाखविण्याच्या प्रयत्नांना कडाडून विरोध केला. छटपूजेला राज यांनी केलेल्या विरोधानंतर मुंबई भाजपचे तत्कालीन अध्यक्ष गोपाळ शेट्टी तसेच राज पुरोहित आपापल्या कारकिर्दीत छटपूजेच्या वाटेला कधी गेले नाहीत.
दरम्यानच्या काळात महायुतीत राज यांनी यावे यासाठी भाजप नेत्यांनी ‘मनसेगीत’ आळवायला सुरुवात केली होती. राज यांच्या विरोधानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीनेही मुंबईत अन्यप्रांतीयांचे उघड लांगूलचालन टाळले. एवढेच नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादीने शहर अध्यक्षपदी मराठी माणसाची नियुक्तीही केली. त्यांचा कित्ता गिरवत भाजपनेही मुंबईच्या अध्यक्षपदी आशीष शेलार यांची नियुक्ती करून ‘मराठीपण’ जपण्याचे काम केले. मात्र मुंबईतील उत्तर भारतीयांची मतपेढी डोळ्यासमोर ठेवून शेलार यांनी मुंबईभर, त्यातही प्रामुख्याने उत्तर भारतीयबहुल मतदारसंघांत जागोजागी छटपूजेसाठी शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक लावले आहेत.
‘मन मांगलो’ला मनाई
दरवर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘मन मांगलो’ संघटनेस यंदा जुहू किनाऱ्यावर छटपूजा करू देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी मनाई केली. मात्र, नियम पाळणाऱ्या बिहारी फ्रन्ट, श्री गणेश नेहरूनगर रहिवाशी संघ आणि छट उत्सव महासंघाला परवानगी दिली आहे. नियम तोडणाऱ्या ‘मन मांगलो’ला जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केल्याचे अतिरिक्त सरकारी वकील जी. डब्ल्यू. मॅटॉस म्हणाले. त्यानंतर न्या. आर. डी. धानुका आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
मराठीचाही सन्मान

उत्तर भारतीय आघाडीतर्फे दरवर्षीच छटपूजा केली जाते. आगामी निवडणुकीनिमित्त अधिक उत्साहाने ती साजरी करण्याचे ठरविले आहे. सर्वानाच बरोबर घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न असून याच कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एका मराठी माणसाला पुरस्कार देण्यात येणार आहे. आम्ही मराठी आणि छटपूजा या दोन्हींचा सन्मान करतो, अशी भूमिका शेलार यांनी मांडली.
राजच उत्तर देतील
विधानसभा निवडणुकीत शेलार यांनी विनवणी केल्यामुळे मनसेने वांद्रे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे टाळले होते. मात्र त्याची परतफेड अपकाराने करीत उतर भारतीयांच्या व्होट बँकेवर डोळा ठेवून शेलार यांच्याकडून जे लांगूलचालन सुरू आहे, त्याला आता राज ठाकरेच उत्तर देतील, असे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितले.