पालिका मुख्यालयातील सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. मात्र पालिका मुख्यालयात ११ पुतळे आणि तीन तैलचित्रे असून शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्यासाठी सभागृहात जागाच शिल्लक नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
शिवाजी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अतूट नाते होते. त्यामुळे शिवाजी पार्कवर त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडून त्याबाबत अद्याप प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. मात्र तत्पूर्वीच भाजपने संधी साधून पालिका मुख्यालयातील सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ शिवसेना नगरसेवकांनीही बाळासाहेबांचा पुतळा पालिकेत उभारण्यात यावा, असा आग्रह धरला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या धैर्याची, वक्तृत्वाची, कर्तृत्त्वाची आणि दूरदृष्टी नेतृत्वाची प्रेरणा नगरसेवकांना मिळावी यासाठी ऐतिहासिक पालिका सभागृहामध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली आहे. त्यापाठोपाठ लगेचच सभागृह नेते यशोधर फणसे आणि शिवसेना नगरसेवक गणेश सानप यांनीही पालिका सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.