शुक्रवार ६ डिसेंबर. संवेदशील दिवस. तीन दहशतवादी.  एके ४७, बॉम्ब आणि पिस्तुल घेऊन क्वालिस गाडीतून निघाले. शहरात जागोजागी नाकाबंदी.पण ती गाडी सहीसलामत तपासणीतून सुटून पुढे जात होती.पण दुपारी साडेबाराच्या सुमारास मानखुर्द येथील लोटस जंक्शन येथील नाकाबंदीत पोलिसांना त्या गाडीचा संशय आला आणि गाडीची तपासणी झाली. गाडीतील शस्त्रसाठा पाहून सारेच अवाक झाले. थोडय़ा वेळातच सारी कवायत पोलिसांचीच ‘परीक्षा’ घेण्यासाठी करण्यात आली होती हे स्पष्ट झाले.
शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश अधून मधून वरिष्ठांक डून दिले जात असतात. ६ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर अशाच प्रकारे संपूर्ण मुंबई शहरात नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. पण आपले पोलीस खरोखरच गांभीर्याने काम करतात का, हे तपासण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त खालिद कैसर यांनी नामी शक्कल लढविली होती. त्यांनी शस्त्रास्त्राचा साठा असलेली क्वालिस गाडी तीन जवानांसह आपल्या विभागात फिरविली. नाकाबंदी असताना कोण ती अडवते का ते त्यांना पहायचे होते. काही ठिकाणाहून ती सहीसलमानत सुटली. परंतु लोटस सिग्नलजवळील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत वाखारे यांना या गाडीचा संशय आला. त्यांनी ती गाडी बाजूला घेऊन तपासणी केली असता त्यांना ही शस्त्रे आढळली होती. नाकाबंदीच्या ‘परीक्षेत’ ते एकप्रकारे पास झाले होते.