राज्य परिवहन विभागाच्या नियमानुसार कालबाह्य़ झालेल्या मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील सुमारे ३३ रुग्णवाहिका डिसेंबरअखेर हळूहळू निकाली काढण्यात येणार आहेत. मात्र पालिकेच्या कालबाह्य़ झालेल्या रुग्णवाहिका भंगारात निघूनही शहरात रुग्णवाहिकेचा तुटवडा फारसा जाणवणार नसल्याचा दावा पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तर पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच या रुग्णवाहिका भंगारात काढल्या जात असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सध्या महापलिकेकडे मुंबईकरांच्या सेवेसाठी एकूण ७२ रुग्णवाहिका आहेत. त्यापकी राज्य परिवहन विभागाच्या नियमानुसार दहा वर्ष उलटून गेलेल्या सुमारे ३३ रुग्णवाहिकाचा कार्यकाल गेल्या वर्षीच संपला आहे. त्यामुळे त्या निकाली काढण्यात येत आहेत. मात्र शहरातील महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध असून पालिकेकडून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत येणारी १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेची मदत घेतली जात असल्याने अद्याप तरी मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवत नसल्याचे पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षी पालिकेच्या १७२ रुग्णवाहिका कालबाह्य़ झाल्याने भंगारात काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी रुग्णवाहिकांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे काही सामाजिक संस्थांकडून भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेण्याचा विचार महापालिकेने केला होता. त्यानंतर राज्य सरकारची १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. मात्र शहरात २६/११ सारखी घटना घडल्यास १०८ रुग्णवाहिका सेवेवर ताण निर्माण होऊ शकतो. त्याचा फटका रुग्णांना बसू शकतो असे जाणकार सांगत आहेत. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना विचारले असता, रुग्णवाहिका भंगारात काढत असताना पर्यायी व्यवस्था आधीच केली जाते. मात्र तसे नसल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.