नाळेमधील रक्ताच्या मूळ पेशींच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या खासगी पेढय़ांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अशा पेढय़ा सुरू कराव्यात, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी लवकरच प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रशासनाने पालिका रुग्णालयांमध्ये अशी पेढी कार्यान्वित केल्यास गरीब रुग्णांनाही आपल्या बाळाची नाळ जतन करून भविष्यात त्याचे आरोग्य निरोगी राखणे शक्य होईल.
मुंबईमधील रुग्णालयांमध्ये दररोज शेकडो बालकांचा जन्म होतो. मात्र खासगी रक्त पेढीचे दर परवडणारे नसल्याने नवजात बालकाची नाळ जतन करणे बहुतांश पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे पालिकेनेच आपल्या रुग्णालयांमध्ये अशी पेढी स्थापन करावी, अशी मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली आहे. सरकारी आणि मोठय़ा खासगी रुग्णालयांनीही पुढाकार घेऊन तेथे ही सेवा उपलब्ध करावी. म्हणजे समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना आपल्या बालकाच्या उत्तम आरोग्यासाठी नाळेच्या रक्तातील मूळ पेशींचे जतन करणे शक्य होईल, असे त्या म्हणाल्या. याबाबतची ठरावाची सूचना पालिका सभागृहाच्या १६ ऑक्टोबरच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. सभागृहाची मंजुरी मिळताच पुढील कारवाईसाठी ही सूचना प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्यास सर्वसामान्य मुंबईकरांनाही आपल्या नवजात बालकाच्या नाळेमधील रक्तातील मूळ पेशी जतन करणे शक्य होणार आहे.
नवजात बालकांच्या नाळेच्या रक्तातील मूळ पेशींचा शोध १९७८ मध्ये लागला आणि १९८८ पासून रक्तातील अमूल्य अशा मूळ पेशीचे जतन करण्यास जगभरात सुरुवात झाली. सध्या अनेक देशांमध्ये नवजात बालकांना भविष्यात होणाऱ्या दुर्धर आजारांवर या पेशी रामबाण उपाय ठरत आहेत. सिकल सेल, अ‍ॅनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया, अ‍ॅप्लॉस्टिक अ‍ॅनिमिया आदी विविध अनुवंशिक आजारांवर या मुळ पेशी गुणकारी ठरल्या आहेत. नाळेतील रक्तावर प्रक्रिया करून मुळ पेशी जतन करणाऱ्या केवळ तीन खासगी रक्त पेशी पेढी महाराष्ट्रात आहेत. त्यांचे दर परवडणारे नाहीत. परिणामी मध्यमवर्गीयांनाही आपल्या बाळाच्या रक्तातील मूळ पेशींचे जतन करता येत नाहीत.