सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या ८० टक्के प्रवाशांना बाजूला करत खासगी गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या २० टक्के श्रीमंतांच्या पारडय़ात सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी वजन टाकले आणि सुधार समितीत पार्किंग शुल्काच्या दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील रस्ते वाहतुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता धूसर झाली आहे. वाट्टेल तशा वाट्टेल तिथे लागलेल्या राजकीय नेते-कार्यकर्त्यांच्या गाडय़ांची रस्त्यावरची बजबजपुरी तशीच कायम राहणार आहे.
वर्षांनुवर्षे रस्त्यावरील मोकळ्या जागांचा मोफत वापर करणाऱ्या गाडीमालकांकडून सार्वजनिक जागेच्या उपयोगाचे शुल्क घेण्यासाठी प्रशासनाकडून पार्किंग शुल्कवाढीचा प्रस्ताव आणला होता. दक्षिण मुंबईतील पार्किंगच्या जागेसाठी तासाला १५ रुपयांऐवजी ६० रुपये प्रति तास इतके शुल्क घेण्याचा तसेच रात्री इमारतीबाहेर गाडय़ा पार्क करणाऱ्यांनाही परिसरातील पार्किंग लॉटनुसार एक तृतीयांश भाडे आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र पार्किंगच्या दरात एकाही रुपयाची दरवाढ करण्यास मनाई करत सुधार समितीतील सदस्यांनी एकमुखाने प्रस्तावाला विरोध केला. विशेष म्हणजे या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसोबत सेना व भाजप असे सर्वपक्षीय  नगरसेवक एकत्र आले होते. रस्ते खड्डेमुक्त करून मुलभूत सोयी आधी द्या, असे सांगत पार्किंग शुल्कवाढ म्हणजे गैरप्रकारांना आमंत्रण आहे. मध्यमवर्गीयांकडेही आता गाडय़ा आहेत. त्यांच्या जुन्या इमारतीत पार्किंग सोयी नाहीत, याबद्दल त्यांना भरुदड कशासाठी, असे सूर समितीत उमटले.
मुंबईत लोकलमधून ६० लाख तर बेस्ट बसमधून ४० लाख प्रवासी प्रवास करतात. उर्वरित १५ ते २० टक्के नागरिक खासगी गाडय़ांमधून शहरात येतात. या श्रीमंत प्रवाशांच्या गाडय़ा रस्त्याकडेला उभ्या राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन उर्वरित प्रवाशांना फटका बसतो. रस्त्यांची जागा अडवणाऱ्या या श्रीमंतांकडून या जागेचे शुल्क घ्यावे, या विचारातून ही योजना आणली होती. या योजनेतील शुल्कवाढीच्या फेररचनेबाबत विचार करण्यास प्रशासन तयार आहे, असे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले.

नगरसेवकांच्या हरकती/ सूचना
*    रस्ते खड्डेमुक्त करा.
*    पार्किंगच्या सोयी द्या.
*    आधी पदपथ नीट करा.
*    दुचाकी स्वार थेट १५ रुपये शुल्क देऊ शकणार नाही.
*    शुल्क वाढवल्यास भ्रष्टाचार वाढेल.
*    पार्किंगमधील गाडय़ांना सुरक्षाही पुरवली जात नाही.
*    नवीन टॉवरमध्ये काही मजले पार्किंगसाठी ठेवा.
*    रात्री गर्दी नसते मग पार्किंग
शुल्क कशासाठी?
*    झोपडपट्टीत राहून रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यांचे काय करणार?
*    गाडय़ांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांशी ताळमेळ कसा साधणार?