शाळा बंद ठेवण्याचा अधिकार पालिकेकडे

शनिवारपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरल्यावर पालकमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर व आयुक्तांसह पोलीस आयुक्त, मध्य व पश्चिम रेल्वेचे प्रमुख, जिल्हाधिकारी आणि कोकण विभागीय आयुक्त यांची बैठक घेतली. येत्या काळात अतिवृष्टी झाली तर शासकीय कृती यंत्रणांची समन्वय समिती तयार करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकेला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुसळधार पावसानंतर पालकमंत्री तावडे यांनी महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट दिली. विविध शासकीय यंत्रणांनी समन्वयाने करावयाच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार आशीष शेलार, महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त सुबोध जायस्वाल, कोकणचे विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. आपत्कालीन व्यवस्थापन, नियंत्रणासाठी वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. अतिवृष्टी झाल्यास मुंबई पालिका, एमएमआरडीए, रेल्वे, बेस्ट, म्हाडा, जिल्हाधिकारी कार्यालये, परिवहन अशा सर्व शासकीय यंत्रणा एकत्रपणे अधिक समन्वय आणि समयसूचकतेने काम करतील असे निर्देश तावडे यांनी यावेळी दिले. ही कृती समिती तात्काळ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व यंत्रणेशी जोडली जाईल.

मालाड येथे मेट्रोचे काम करणाऱ्या एमएमआरडीएची क्रेन बंद पडल्याने कालच्या पावसात वाहतूक कोंडीचा फटका मुंबईकरांना बसला, त्यामुळे एमएमआरडीएने अशा क्रेन ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. शिवाय अशा दुर्घटना घडू नयेत याबाबतची खबरदारी घ्यावी, अशी मागणी आमदार आशीष शेलार यांनी केली.

सोमवारी पाऊस सुरू झाल्यावर सर्व शाळा बंद ठेवण्याचे पत्रक तावडे यांच्याकडून जारी करण्यात आले. मात्र मंगळवारी अतिवृष्टी सुरू होऊनही त्याबद्दलचा इशारा नसल्याने शाळा बंद ठेवण्याचे पत्रक जारी करण्यात आले नसल्याने तावडे यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या. अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याबाबतचे परिपत्रक त्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत महानगरपालिकेकडून जारी करण्यात येईल आणि हे परिपत्रक सर्व शाळांसाठी असेल, असे तावडे यांनी बैठकीनंतर सांगितले.