मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने परवानगी न घेता जुहूमधील सहा माळ्यांच्या निवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरु केल्याचा मुंबई महापालिकेचा आरोप आहे. मुंबई पालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

दरम्यान सोनू सूदने आपल्याकडे महापालिकेची परवानगी असून महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.

महापालिकेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “सोनू सूदने जुहूमधील परवानगी न घेता एबी नायर रोडवर असणारी सहा माळ्यांची रहिवासी इमारत शक्ती सागर बिल्डिंगचं रुपांतर हॉटेलमध्ये केलं आहे”. नोटीस देण्यात आल्यानंतरही सोनू सूदने बेकायदेशीर बांधकाम सुरु ठेवण्यात आल्याचा आरोप पालिकेने केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीसविरोधात सोनू सूदने सिव्हिल कोर्टात धाव घेतली होती, पण त्याला दिलासा मिळाला नव्हता. “कोर्टाने सोनू सूदला हायकोर्टात जाण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला होता. तीन आठवडे उलटले असून सोनू सूदने अद्याप केलेले बदल दुरुस्त केलेले नाहीत. त्यामुळे आम्ही एमआरटीपी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे,” अशी माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली.

सोनू सूदने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “बदल करण्यासाठी मी आधीच महापालिकेकडून परवानगी घेतली आहे. हा विषय महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीचा आहे. करोनामुळे परवानगी मिळू शखली नाही. यामध्ये कोणताही गैरकारभार नाही. मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. करोना संकटात हे हॉटेल करोना योद्ध्यांसाठी वापरण्यात आलं. जर परवानगी मिळाली तर मी पुन्हा याचं रुपांतर निवासी इमारतीत करेन. मी पालिकेच्या तक्रारीविरोधात हायकोर्टात जाणार आहे”.