News Flash

आजचे भागले, उद्याचे काय?

लशींच्या मर्यादित पुरवठय़ामुळे पालिकेसमोर प्रश्न; बुधवारी ७० हजार कुप्यांचा साठा प्राप्त

लशींच्या मर्यादित पुरवठय़ामुळे पालिकेसमोर प्रश्न; बुधवारी ७० हजार कुप्यांचा साठा प्राप्त

मुंबई : करोना प्रतिबंधक लशीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असताना दररोज दिवसभर पुरेल इतकाच साठा उपलब्ध होत असल्याने पालिकेची मात्र पंचाईत झाली आहे. पालिकेला बुधवारी रात्री ७० हजार लशींच्या मात्रा प्राप्त झाल्याने गुरुवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) केंद्रासह पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू झाले. लशीचा साठा संपण्याच्या भीतीने गुरुवारी अनेक लसीकरण केंद्रावर नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावलेल्या होत्या. हा साठा दिवसभरातच संपण्याची शक्यता असल्याने शुक्रवारचे काय, असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे. हा पेच दररोजच उद्भवत आहे.

लससाठा नसल्याने गुरुवारी ४० खासगी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार असल्याचे, तसेच पालिकेची केंद्रे  सुरू राहतील असे बुधवारी प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे लस घेण्यासाठी पालिकेच्या केंद्रांवर सकाळी सातपासूनच रांगा लागलेल्या होत्या. पालिकेने सकाळी नऊच्या सुमारास केंद्रांना साठा वितरित केल्याने बहुतांश केंद्रे १० ते ११ च्या दरम्यान सुरू झाली. ज्या केंद्रांवर आधीचा काही साठा होता, त्या केंद्रांनी नेहमीप्रमाणेच सकाळी आठ वाजता लसीकरण सुरू केले.  दुसरी मात्रा घेणाऱ्यांनीच येण्याचे आवाहन पालिकेने केले असले तरी अनेक केंद्रांवर पहिली मात्रा घेण्याकरिता मोठी गर्दी होती.

बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर बुधवारी उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथे कडक पोलीस बंदोबस्त होता. ‘आज केवळ पाच हजार मात्राच प्राप्त झाल्या आहेत. हा साठा एका दिवसाचा असून उद्या लसीकरण होईल का हे सांगता येणार नाही,’ अशी माहिती केंद्रावरील डॉक्टरांनी दिली.

गोरेगावच्या नेस्को केंद्रावरही सकाळपासूनच तुडुंब गर्दी होती. याची चित्रफितही समाजमाध्यमांवर फिरत असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्राला भेट दिली. धारावीतही लसीकरण केंद्रावर गर्दी वाढत असून केंद्रावर दुपारी १२च्या सुमारास लसीकरण सुरु झाले. सध्या दोन दिवस पुरेल इतक्या कुप्या असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.

दुसरी मात्रा घेणाऱ्यांनाच प्राधान्य

सद्यस्थितीत १५ मेपर्यंत लसीकरणाचा दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तेव्हा संबंधित लसीकरण केंद्राकडून संदेश प्राप्त झाल्याशिवाय नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, तेव्हा याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी. केंद्रावर गर्दी झाल्याने करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही भीती महापौरांनी व्यक्त केली.

पोद्दार लसीकरण केंद्र बंदच

वरळीतील पोद्दार रुग्णालयातील लसीकरण केंद्राला सलग दुसऱ्या दिवशी लशींचा साठा मिळू शकला नाही. परिणामी, लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना प्रवेशद्वारावरूनच माघारी पाठविले जात होते.  दरम्यान, पालिकेने लसीकरण सुरू असलेल्या पोद्दार रुग्णालयाचे नाव नमूद के ले आहे. चुकीची माहिती दिल्याने नागरिकांची गेले काही दिवस गैरसौय होत असल्याचे काहींनी सांगितले.

अ‍ॅप संथगतीने

पोद्दार रुग्णालयातील लसीकरण ठप्प झाल्याने नागरिकांनी नजीकच्या राज्य विमा कामगार रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी केली होती. मात्र केंद्रावरील अ‍ॅप संथगतीने सुरू होते. परिणामी लसीकरणासाठी वेळ लागत होता, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. केंद्रावरील नागरिकांची गर्दी वाढल्याने काही नागरिकांना कूपन देऊन उर्वरित नागरिकांना कर्मचाऱ्यांनी घरी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे रांगेत थांबून परतावे लागले.

‘आज ७० हजार लशींच्या मात्रा वितरित केल्या असून सध्या पालिके कडे कोणताही साठा शिल्लक नाही. या कुप्या गुरुवारी दिवसभरातच संपण्याची शक्यता आहे. पुढील साठा येण्याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे रात्री सर्व केंद्रावरील आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी लसीकरण सुरू असेल का हे सांगता येईल.’

– डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:13 am

Web Title: bmc get stock of 70000 vaccine doses on wednesday zws 70
Next Stories
1 बेघर, भिक्षेकऱ्यांच्या भोजनासाठी पालिकेचा पुढाकार
2 संक्रमण शिबिरातील भाडेकरूंना ‘म्हाडा’चे ‘अभय’
3 रस्ता रुंदीकरणासाठी आठ झाडांची कत्तल
Just Now!
X