फोर जी नेटवर्कसाठी अंधेरी व मरोळ परिसरातील रस्ते पूर्वपरवानगीशिवाय खोदल्याने रिलायन्स जियोला १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मकवाना रस्ता, हिंदू फ्रेण्ड्स सोसायटी रोड आणि मरोळ मिलिटरी रोड या ठिकाणी रस्ता खोदण्याची परवानगी पालिकेकडून घेण्यात आली नव्हती. या संदर्भात पालिकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. या रस्त्यावरील एक किलोमीटर लांबीवर पालिकेने डिसेंबरमध्ये काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली होती. हे काम पावसाळ्याआधी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र रिलायन्सने या भागात रस्ते खोदून नेटवर्क टाकण्यास सुरुवात केली. रस्त्याची अवस्था पाहिल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी त्याविरोधात कारवाईला सुरुवात केली. रिलायन्सने पालिकेकडे ठेवलेल्या अनामत रकमेतून हा दंड वसूल करण्यात येईल, असे ‘के-पूर्व’च्या पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधीही फोर जी नेटवर्कसाठी रस्ते खणताना जलवाहिन्यांना गेलेला तडा तसेच रस्त्यांवर परवानगीशिवाय चर खणल्याप्रकरणी रिलायन्स जियो वादात अडकली होती.