अधिकारी, अभियंत्यांना नोटिसा; विभागीय चौकशीची टांगती तलवार

रस्त्यांच्या कामात निष्काळजीपणा आणि सुचविलेल्या कामांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या ‘पी-उत्तर’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांवर ताकीद नोटीस, तर रस्ते विभागातील उपप्रमुख अभियंता आणि दोन कार्यकारी अभियंत्यांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी दिले. परिणामी, अधिकारी आणि अभियंत्यांना आता विभागीय चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पावसाच्या तडाख्यात रस्ते खड्डेमय होण्यापूर्वीच पालिका आयुक्तांनी अधिकारी, अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने पालिकेतील कर्मचारी वर्गाच्या पोटात भीतीने गोळा उठला आहे.

पालिका मुख्यालयात शनिवारी आयोजित करण्यात करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या मासिक आढावा बैठकीत अजोय मेहता यांनी नेलासफाई, रस्त्यांची कामे आणि पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, सर्व उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुख उपस्थित होते. या वेळी पालिका अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामांचे सादरीकरण केले. या सादरीकरणादरम्यान आढळून आलेल्या त्रुटींवरून अजोय मेहता प्रचंड संतापले.

‘पी-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील प्राधान्यक्रम २ मध्ये १२ रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे साहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी यापूर्वी सूचित केले होते. मात्र १२ पैकी प्रत्यक्षात दोन रस्त्यांचीच कामे झाली असल्याची बाब आय. ए. कुंदन यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. प्राधान्यक्रम २ मध्ये १२ रस्त्यांची कामे करायची नव्हती, तर ती सुचविण्यात का आली, असा जाब विचारत अजोय मेहता यांनी संगीता हसनाळे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. संगीता हसनाळे यांनी तात्काळ ताकीद नोटीस द्यावी, असे आदेश अजोय मेहता यांनी दिले.

पावसाळ्यात रस्त्यांची काळजी घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले कंत्राटदार आणि दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांचे कंत्राटदार यांची प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांनी तातडीने बैठक घ्यावी. या कंत्राटदारांना साधनसामग्री, मनुष्यबळ व एकूण क्षमता यांच्या उपलब्धतेबद्दल आढावा घेऊन त्यांना पूर्वतयारीत राहण्याचे आदेश द्यावेत. त्यांचे संपर्क क्रमांक संबंधित साहाय्यक आयुक्तांना द्यावेत, असेही अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यात नाले तुंबून सखल भाग जलमय झाले आणि रस्ते पुन्हा खड्डय़ांमध्ये गेल्यास आपल्याला कारवाईला सामोरे जावे लागेल या भीतीने अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी गर्भगळीत झाले आहेत.दर वर्षी पावसाळ्यात जलमय होणाऱ्या मुंबईतील सखल भाग परिसरात गणवेशधारी तब्बल २५०० पालिका कर्मचाऱ्यांचा तैनात करण्यात येणार आहे.

कर्तव्यात कसूर

पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होऊन मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. मात्र रस्त्यांच्या कामात कुचराई करणारे रस्ते विभागातील उपप्रमुख अभियंता आणि दोन कार्यकारी अभियंता यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे निर्देशही अजोय मेहता यांनी दिले. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या तिघांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

  • शहरात १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०१७ या काळात ३७८.१२ कि.मी. लांबीचे चर खोदण्याची परवानगी विविध सेवा उपयोगिता कंपन्यांना देण्यात आली होती.
  • यापैकी ३६९.६० कि.मी. लांबीचे चर बुजवून रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत.
  • उर्वरित ८. ६० कि.मी. लांबीचे खोदलेले चर येत्या तीन दिवसांमध्ये पूर्ववत करण्याचे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले.