कर्मचाऱ्यांनाच अ‍ॅप डाऊनलोड करून कचऱ्याच्या तक्रारी करण्याची सक्ती; प्रत्येकाला २०० तक्रारी करण्याचे व सोडवण्याचे लक्ष्य

गेल्या वेळी स्वच्छ सर्वेक्षणातील घसरलेल्या स्थानाचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एवढा धसका घेतला आहे की या स्पर्धेतील सर्व अटी कोणत्याही मार्गाने पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. या परीक्षेतील ३५ टक्के गुण हे नागरिकांच्या प्रतिसादाबाबत आहेत. त्यापैकी काही गुण हे केंद्र सरकारने सुरू केलेले स्वच्छ सर्वेक्षण अ‍ॅपवरून नागरिकांच्या आलेल्या तक्रारी किती वेळेत सोडवल्या जातात त्यावरून दिले जाणार आहेत. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांना हे अ‍ॅप डाउनलोड करण्याची सक्ती केली असून घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रत्येक सहाय्यक अभियंत्याला २०० तक्रारी अ‍ॅपवर टाकण्याचे व त्या वेळेत सोडवण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पाहणी पथकाकडून जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात शहरातील स्वच्छता विविध निकषांवर पडताळून पाहिली जाणार आहे. या परीक्षेसाठी ४००० गुण असून त्यापैकी १४०० गुण स्वच्छतेसाठी पालिकेने केलेल्या कामांबाबत आहे. या गुणांसाठई महानगरपालिकेने तळमजल्यावर २० ते २२ कर्मचाऱ्यांचा वॉर रूम तयार केला असून प्रत्येक वॉर्डमधील घनकचरा व मलनिसारणाशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. उरलेल्या गुणांपैकी १२०० गुण हे प्रत्यक्ष पाहणीसाठी आहेत. त्यात महापालिकेला फारसे काही करता येणार नाही. तर १४०० गुण हे नागरिकांच्या प्रतिसादाबाबत आहेत. शहरातील किमान दोन टक्के नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड केलेले असावे व त्यावर पाठवलेल्या तक्रारी १२ तासात (सव्‍‌र्हिस लेव्हल अ‍ॅग्रीमेण्ट- एसएलए) सोडवण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. गेल्या वेळी नागरिकांच्या अपुऱ्या प्रतिसादाअभावी पालिकेचा क्रमांक दहावरून २९ वर घसरल्याचे पालिका अधिकाऱ्यांचा दावा होता. त्यामुळे यावेळी याबाबतही पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील एकूण लोकसंख्या १ कोटी २४ लाख असून दोन टक्के म्हणजे किमान अडीच लाख रहिवाशांनी अ‍ॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे. वर्षभर या अ‍ॅपबाबत फारशी जागरुकता न केलेल्या महापालिकेने दोन आठवडय़ांपासून कार्यक्रम हाती घेतले. मात्र ते करूनही फारसे यश मिळत नसल्याने पालिकेचे शिक्षक, कर्मचारी यांना सक्तीने हे अ‍ॅप डाउनलोड करण्याविषयी सांगण्यात आले. तरीही आतापर्यंत केवळ ६५ हजार भ्रमणध्वनींवरच हे अ‍ॅप डाउनलोड झाले आहे. कचरा साठणे, कचरागाडी न येणे, सार्वजनिक शौचालय तुंबलेली असणे, शौचालयात पाणी किंवा वीज नसणे अशा तक्रारी या अ‍ॅपवरून पाठवणे व त्या सोडवल्या जाणे अपेक्षित आहे. मात्र प्रतिसाद येत नसल्याने घायकुतीला आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी विभागातील सहाय्यक अभियंत्यांनाच कामाला लावले आहे.