समुद्रकिनारी पर्यटकांना परवानगी, मात्र स्टॉलला नाही

अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : समुद्रकिनारी फेरफटका मारण्याची परवानगी पर्यटकांना दिली असली तरी या ठिकाणी व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविणाऱ्यांना अद्याप स्टॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नाही. परिणामी मागील सहा महिन्यांपासून रोजगाराचे साधनच हिरावले गेलेल्या या स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे स्टॉल सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हे व्यावसायिक करत आहेत.

टाळेबंदी शिथिल झाली असून बहुतांश दुकाने सुरू झाली आहेत. त्याचबरोबर शहरात जागोजागी पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटून गुजराण सुरू केली आहे. मात्र समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना चटपटीत खाद्यपदार्थ देऊन उदरनिर्वाह चालविणाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी अद्याप मिळाली नाही. मागील सहा महिन्यांपासून त्यांची कमाई पूर्णपणे बंद आहे.

जुहू चौपाटीवर सुमारे ८० स्टॉलधारक असून त्यात जवळपास ३५० ते ४०० लोकांना रोजगार मिळतो. सध्या हे सर्व स्टॉल बंद आहेत. गणेश थेवर यांचा जुहू चौपाटीवर पावभाजीचा स्टॉल आहे. त्यांच्याकडे सात कामगार कामाला होते. रोजगार गेल्याने या कामगारांनी गाव गाठले. मात्र तेथेही उपजीविकेचे साधन नाही. परिणामी गणेश हेच या कामगारांना दर महिन्याचा अर्धा पगार देत आहेत. त्यासाठी त्यांना दर महिना ३५ हजार रुपयांची जुळणी करावी लागत आहे. ‘टाळेबंदीमुळे सर्वाचीच स्थिती विदारक झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत उधारीवर खर्च चालवत आहे. यावर किती दिवस गुजराण करता येईल याची खात्री नाही. कामगारांनाही या परिस्थितीत कुटुंबाला दोन वेळचे अन्न देता यावे यासाठी अर्धा पगार देत आहे,’ असे गणेश सांगतात. तर जुहू चौपाटीवरच खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर कामाला असलेला मोहम्मद मेहबूब याला सहा महिन्यांपासून पगार नाही. ‘काम करत असलेल्या ठिकाणीच राहत आहे. मालकाकडून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. मात्र पगार नसल्याने गावाकडे पाठवायला पैसे नाहीत. आता त्यांनाही कर्ज काढून घरखर्च भागवावा लागत आहे,’ अशी व्यथा मेहबूब व्यक्त करतो.

‘तिघे भाऊ जुहू किनाऱ्यावरच खाद्यपदार्थाची विक्री करतो. सहा महिन्यांपासून तिघेही बेरोजगार आहोत. सध्या २३ लोकांच्या कुटुंबाची गुजराण कशी चालवायची हाच प्रश्न पडला आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी. तसेच स्टॉल सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जुहू बीच खाद्यपेय फूडकोर्ट असोसिएशनचे सचिव दीपक कदम यांनी केली आहे.

छायाचित्रकारही बेरोजगार

जुहू किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची आकर्षक छायाचित्रे काढून उदरनिर्वाह चालविणाऱ्या छायाचित्रकारांनाही पर्यटकांअभावी काम नाही. मढ आयलंड येथे राहणारा सोनू प्रसाद १२ वर्षांपासून पर्यटकांची छायाचित्रे काढून गुजराण करतो. ‘शुक्रवारी दोन लोकांची छायाचित्रे काढून दिली. त्यातून ६० रुपये मिळाले. त्यातील ३० रुपये प्रवास भाडय़ाला आणि २० रुपये छायाचित्रणासाठी खर्ची पडले. फक्त १० रुपये उरले. घरात चार महिन्यांची मुलगी आहे. या कमाईत तिचा सांभाळ कसा करायचा’ असा प्रश्न सोनू विचारतात.