शिवसेना, पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा भाजपचा आरोप

मुंबई: पीएम केअर फंडातून मुंबईसाठी देण्यात आलेले तब्बल ४०० व्हेंटिलेटर विविध रुग्णालयात धूळखात पडले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दररोज अनेक रुग्ण व्हेंटिलेटरअभावी प्राण गमावत असताना पालिकेच्या या बेजबाबदारीला सत्ताधारी शिवसेना पक्ष आणि पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

मुंबई महानगरपालिकेला पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले सुमारे ४०० व्हेंटिलेटर वापरात नसून गेला महिनाभर ते धूळ खात पडले असल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. हे व्हेंटिलेटर विविध करोना आरोग्य केंद्रात तसेच प्रमुख महापालिका रुग्णालये, इतर उपनगरीय रुग्णालयांत पडून आहेत. अद्याप ते चालू करण्यात आलेले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, पालिका प्रशासनाने भाजपचे आरोप फेटाळले आहेत. केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून ४४६ व्हेंटिलेटर पुरवण्यात आले आहेत. हे व्हेंटिलेटर टप्प्याटप्प्याने प्राप्त झाले आहेत. संबंधित कंपनीच्या तांत्रिक कर्मचारी व मनुष्यबळाने त्यांची जोडणी व उभारणी करणे आवश्यक असते. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. संबंधित कंपन्यांकडून मनुष्यबळ उपलब्ध करून ही व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात येत असून बहुतांश ठिकाणी व्हेंटिलेटर सुरूही झाले आहेत. टप्प्याटप्प्याने व्हेंटिलेटर प्राप्त होत असताना त्यांचे संचालन करण्यासाठी प्रशिक्षित व वैद्यकीय मनुष्यबळही नेमावे लागते. त्यामुळे ते बसवण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्याने खाटा रिक्त  

मुंबईत रुग्णवाढीचा आलेख घसरू लागला आहे. ७० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने विविध रुग्णालये, कोरोना आरोग्य केंद्र यामधील रुग्णशय्या (बेड) रिक्त असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. रुग्णशय्या रिक्त असणे हे मुंबईतील परिस्थिति नियंत्रणात असल्याचे चिन्ह असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.

व्हेंटिलेटरची सद्यस्थिती

४४९ खासगी रुग्णालये

५१४ पालिका रुग्णालये

९० करोना केंद्रे

१,०५३ पालिकेकडे असलेले एकूण व्हेंटिलेटर

९२८ व्हेंटिलेटरवरील रुग्ण

१२५ रिक्त व्हेंटिलेटर