* निकृष्ट रस्त्यांबद्दल सुमारे अडीचशे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात * कारवाई निवडणुकीनंतर?

महापालिका प्रशासनाने केलेल्या रस्ते घोटाळ्याच्या चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल २०० रस्त्यांच्या कामांमध्येही अनियमितता आढळून आली असून कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. या घोटाळ्यामध्ये कंत्राटदारांसोबत पालिकेचा अख्खा रस्ते विभागच संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. मात्र पालिका निवडणुका होऊ घातल्याने २०० रस्त्यांच्या चौकशीचा अहवाल तूर्तास रोखण्यात आल्याचे समजते. मात्र, या घोटाळ्यातील अडीचशेहून अधिक अधिकाऱ्यांवर पालिकेने संशयाची सुई रोखली आहे.

[jwplayer w5DlsZoi]

नालेसफाईप्रमाणे मुंबईतील रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा होत असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी गोपनीय पत्र पाठवून पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत अजोय मेहता यांनी रस्ते कामांच्या चौकशीचे आदेश दिले. पहिल्या टप्प्यात चौकशी करण्यात आलेल्या ३४ रस्त्यांच्या कामांत अनियमितता आढळून आली. त्यानंतर पालिकेने रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार, दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर आणि कार्यकारी अभियंता किशोर येरमे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले.

आयुक्तांनी आणखी २०० रस्त्यांच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या २०० रस्त्यांची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी समितीचा अहवाल तयार झाला आहे. या २०० रस्त्यांच्या कामांमध्येही प्रचंड मोठय़ा प्रमाणावर अनियमितता असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. या प्रकरणी अधिकारी, खासगी लेखापाल आणि कंत्राटदारांवर ठपका ठेवला आहे. रस्त्यांची संख्या मोठी असल्याने घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड आहे. पालिकेच्या रस्ते विभागात सुमारे २६९ अधिकारी, अभियंते, कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी या घोटाळ्यात गुंतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण विभागावरच गंडांतर येण्याची शक्यता असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी धास्तावले आहेत.

सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. २०० रस्त्यांच्या घोटाळ्याचा अहवाल जाहीर केल्यास त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तूर्तास पालिका प्रशासनाने हा अहवाल रोखून धरला आहे. मात्र पालिका निवडणुका पार पडल्यानंतर हा अहवाल जाहीर करण्यात येणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

नेमका घोटाळा काय?

* रस्ते निर्मितीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे

* रस्त्यासाठी कमी जाडीचा थर रचणे

* निकषानुसार रस्ते निर्मिती न करणे

* लेखापालांचे रस्ते कामांकडे दुर्लक्ष

आतापर्यंतचे दोषी

* पालिका रस्ते विभाग – प्रमुख अभियंता अशोक पवार, दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर, कार्यकारी अभियंता किशोर येरमे

* रस्त्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या ऑडिट कंपनीतील कर्मचारी – लेखापाल संतोष कदम, अशफाक सय्यद, मिलिंद कुमावत, राकेश मेरवाडे, पवनकुमार शुक्ला, प्रेमानंद धनावडे, मंगेश तळेकर, धिरज फुलझेले, राहुल शिंदे, धैर्यशील पाटील

* कंत्राटदार – आर. के. मधानी, रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टस् लिमिटेड, महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड, जे. कुमार, के. आर. कन्स्ट्रक्शन, आर. पी. एस.

* दोन थर्ड पार्टी ऑडिट कंपन्या

[jwplayer qV6NiJ2F]