मुंबई मोठा पाऊस झाल्यानंतर विविध भाग तुंबण्याची परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. याला प्रामुख्याने नाले कारणीभूत असल्याचा आरोप होतो. नाल्यांची सफाई न झाल्याने पाणी वाहून जात नाही, याला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातो. त्यामुळेच आता नाले सफाईबाबत मुंबई महापालिकेने धोरण जाहीर करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधानसभेत सदस्यांकडून सुरु असलेल्या मुंबई आणि राज्यातील पाऊस आणि घडलेल्या दुर्घटना याबाबतच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.

नाले सफाईबाबत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जुलैपर्यंत नालेसफाई झाली पाहिजे. यासंदर्भातील धोरण महापालिकेने तयार करुन ते घोषित करावे, त्यानंतर याबाबत निश्चितपणे कारवाई केली जाईल. तसेच मुंबईत काल रात्री झालेला पाऊस हा १९७४ मध्ये झालेल्या पावसानंतर सर्वात मोठा पाऊस होता. अशा प्रकारे कमी वेळात मुंबईत अभुतपूर्व पाऊस झाल्याने मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागला.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत महिनाभराचा पाऊस तीन दिवसांत पडला, कमी वेळात जास्त पावसाचा मुंबईवर ताण आला. दरम्यान, फुटेजच्या माध्यमांतून कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस पडतोय याचा अभ्यास करुन यावर कारवाईचे आदेश महापालिकेला दिल्याचे त्यांनी सांगितले. नाल्यांमधली अतिक्रमणांमुळ रुंदीकरणाला अडचण होत आहे. तसेच मिठी नदीवरील अतिक्रमण हटवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळली. यातील जखमींची शताब्दी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच या दुर्घटनेत जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत तसेच महापालिकेनेही त्यांना पाच लाख रुपये द्यावेत अशा सूचना केल्या आहेत तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तसेच पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूजवळील भिंतीवर झाडं पडून ती झोपड्यांवर पडल्याने झालेल्या दुर्घटनेचा उल्लेख करीत यात मृत्युमुखी पडलेल्या ६ कामगारांच्या कुटुंबियांना तसेच जखमी झालेल्या ४ जणांना शासनाकडून मदत देण्यात येईल. अशा घटना होऊ नयेत यासाठी पुणे महानगरपालिकेने २६७ जागी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यामुळे येथील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री विधानसभेत सांगितले.